न्यूझीलंडच्या या माजी प्रशिक्षकाला आता बनायचे आहे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक


न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना आता भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बनायचे आहे. 44 वर्षीय माईक हेसन यासाठी लवकरच अर्ज देखील करणार आहेत. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 जुलै आहे.

हेसन सहा वर्ष न्यूझीलंडच्या संघाचे प्रशिक्षक होते. त्यांनी 2018 साली आपला राजीनामा दिला होता. न्युझीलंडचे प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ यशस्वी ठरला होता. ते प्रशिक्षक असताना न्युझीलंड 2015 विश्वचषक फायनलमध्ये देखील पोहचले होते. हेसन यावर्षी पुन्हा प्रशिक्षकपदाच्या भूमिकेत परतले आहेत. या वर्षी आयपीएलमध्ये ते किंग्स एलेव्हन पंजाबचे प्रशिक्षक होते. मात्र त्यांना आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतायचे आहे.

सांगण्यात येत आहे की, हेसन बीसीसीआयच्या वेबसाईटवर मुख्य प्रशिक्षकासंबंधी असलेल्या अटींचा अभ्यास करत आहेत. त्यामुळे ते लवकरच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करू शकतात.

हेसन यांच्यासाठी अडथळा म्हणजे किंग्स इलेव्हन बरोबर आयपीएलमध्ये असलेला त्यांचा जॉब देखील आहे. आयपीएलशी संबंधीत प्रशिक्षकाला एक एफिडेविट देणे आवश्यक असते. गैरी कर्स्टन यांना महिलांच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करताना या गोष्टीचा सामना करावा लागला होता.

गैरी कर्स्टन हे रॉयल चॅलेंजर्स बँग्लोरचे प्रशिक्षक असतानाच त्यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. प्रशिक्षकासाठी ते पहिली पसंती असताना देखील नियमात न बसल्याने त्यांना ते पद मिळाले नव्हते.

बीसीसीआयचे काम पाहण्यासाठी सुप्रीम कोर्टाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या नियुक्त प्रशासक समितीने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि अन्य स्टाफसाठी अर्ज मागवले आहेत.

संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सदस्यांना पदासाठी अर्ज करावा लागणार नाही. त्यांना मुलाखतीसाठी थेट प्रवेश मिळेल. विश्वचषक समाप्त झाल्यानंतर संघाच्या कोचिंग स्टाफचा कार्यकाळ देखील समाप्त झाला होता. मात्र त्यांचा कार्यकाळ 45 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे.

सांगण्यात येत आहे की, मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये रवी शास्त्री यांच्याबरोबरच गैरी कर्स्टन, महैला जयवर्धने, टॉम मुडी आणि विरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.

Leave a Comment