आई तुझी आठवण येते, मुलाच्या या कृत्याने गहिवरले उपस्थित


फिलिपिन्स विद्यापीठात दरवर्षी प्रमाणे यंदाही पदवीदान समारंभ पार पडला पण हा समारंभ वेगळा ठरला तो पाउलो जॉन अलिंग या विद्यार्थ्यामुळे. पाउलोने यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना भावूक केले. पाउलो त्याची पदवी घेण्यासाठी आला तेव्हा सोबत त्याने आणले होते आईचे कटआउट. त्याची आई २०१६ मध्ये मृत्यू पावली आहे पण पाउलो याला पदवी घेताना आई सोबत हवी अशी तीव्र इच्छा होती त्यामुळे त्याने आईचे कटआउट आणले असे सांगितले.

पाउलो सांगतो, माझी आई सिंगल मदर होती. तिने खूप कष्ट करून मला मोठे केले शिक्षण दिले. पदवी घेताना अन्य मुले त्याच्या पालकांसोबत फोटो काढतात तेव्हा मलाही आईसोबत फोटो काढावा अशी इच्छा होती. या संदर्भात त्याने ट्विटरवर टाकलेला मजकूर खूपच हृद्य आहे. तो लिहितो, ‘ आई तुझा मुलगा ग्रॅज्यूएट झाला. याचा तुला आनंद झाला असणार याची मला खात्री आहे. मी हे केले कारण तुझी तशी इच्छा होती. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. या पुढे पाउलो दोस्ताना संदेश देताना म्हणतो, जे आपल्याजवळ आहे त्याची जाणीव ठेवा कारण कुणी सांगावे, उद्या ते नसेलही.’

Leave a Comment