वाराणसी मध्येही आहे पशुपतीनाथ मंदिर


महादेवाची नगरी वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगामधील एक असलेले जगप्रसिद्ध मंदिर आहे. येथे वर्षभर देश विदेशातून पर्यटक येत असतात. याच वाराणसी मध्ये पशुपतीनाथाचे मंदिर असून त्याला नेपाळी मंदिर या नावानेही ओळखले जाते. नेपाळ मधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराप्रमाणेच हे मंदिर बांधले गेले असून ते नेपाळ राजाने बांधले आहे. हे मंदिर सुमारे १५० वर्षे जुने आहे.

नेपाळ मधील पशुपतीनाथ मंदिर बागमती नदीकाठी आहे तर वाराणसीतील मंदिर गंगेकाठी आहे. गंगेच्या ललिता घाटावर हे मंदिर असून येथेही खूप नेपाळी दर्शनासाठी येतात. या मंदिराच्या संरक्षणाचे काम नेपाळी सरकारकडे आहे. या दोन्ही मंदिरात एकाच प्रकारे पूजाअर्चा केली जाते आणि ती नेपाळी समुदायाकडूनच केली जाते. या मंदिरात दर्शन घेतले कि नेपाळच्या पशुपती मंदिरात दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते अशी भावना आहे.


या मंदिराचे बाह्यस्वरूप नेपाळ मधील मंदिराप्रमाणेच आहे. आत शिवलिंग आहे. नेपाळचा राजा बहादूर साहा या मंदिराची उभारणी करण्यासाठी भारतात आला होता आणि अठराव्या शतकात त्याने हे काम सुरु केले पण १८०६ साली त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचा मुलगा राजा राजेंद्रवीर विक्रम साहा याने १८४३ मध्ये हे काम पूर्ण केले. त्यासाठी नेपाळी कारागीर बोलावले गेले होतेच पण मंदिरात जे लाकडी काम आहे ते लाकूड सुद्धा नेपाळ मधून आणले गेले होते.

Leave a Comment