एकही फाईट न हरलेल्या मुष्टियोद्धयाचा दुर्देवी अंत


रशियाचा उदयोन्मुख आणि अतिशय तयारीचा मुष्टीयोद्धा २८ वर्षीय मॅग्झिम ददाशेव याचा मंगळवारी दुर्देवी मृत्यू ओढवला. त्याच्या निधनाने क्रीडा क्षेत्रावर दुःखाची छाया पसरली आहे. मॅग्झिम ददाशेव आजपर्यत लढलेल्या सर्व १३ फाईट मध्ये अजेय राहिला होता. मात्र त्याची चौदावी फाईट त्याला या जगातून हद्दपार करणारी ठरली. शनिवारी आयबीटी ज्युनिअर वेल्टरवेट टायटल साठी एलीमिनेटर बाउट मध्ये तो सुब्रील मटीयास याच्याबरोबर लढत असताना एक पंच त्याच्या डोक्यात बसला आणि त्याला डोक्यात जखम झाली. त्याला जागेवरच उलटी झाली आणि त्याची हालत पाहून त्वरित सामना थांबवून त्याला रुग्णालयात दाखल केले गेले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली पण मंगळवारी त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरनी जाहीर केले.

या सामन्यात मटीयास आणि ददाशेव दोघेही आक्रमक खेळत होते. ११ व्या राउंड पर्यंत चुरशीची लढत सुरु होती त्याचवेळी ददाशेव याला डोक्याला दुखापत झाली. तो मॅड मॅक्स नावाने क्रीडा जगतात प्रसिद्ध होता आणि रिंगमध्ये तो उतरला कि जणू त्या रिंगचा बादशहा बनत असे. चांगले चांगले बॉक्सर सुद्धा त्याच्याबरोबर लढताना थरकापत असत असा त्याचा दरारा होता. रशियन बॉक्सिंग फेडरेशनने ही दुर्देवी घटना असून त्याची चौकशी केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment