स्नॅपडीलची वापसी, आनंद पिरामलनी गुंतवले पैसे


अमेझॉन आणि फ्लिपकार्टने निर्माण केलेल्या जबरदस्त आव्हानाला सामोरे जात असताना स्लो डाऊनचा शिकार बनलेली ई कॉमर्स कंपनी स्नॅपडील पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅकच्या तयारीत असल्याचे समजते. अंबानी कुटुंबाचे जावई आणि पिरामल ग्रुपचे कार्यकारी संचालक आनंद पिरामल यांनी स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक केली आहे. मात्र ही त्यांची वैयक्तिक गुंतवणूक आहे असे समजते. या संदर्भात पिरामल म्हणाले कि देशाच्या निम्नस्तरीय शहरी भागातील ग्राहकांत स्नॅपडील लोकप्रिय ठरली आहे.

२०१७ च्या ऑगस्ट मध्ये स्नॅपडीलने फ्लिपकार्ट बरोबर होणार असलेला ८.५० कोटी डॉलर्सचा प्रस्तावित विलय करार रद्द केला होता. गेले काही महिने अमेझॉनने भारतात चांगलाच जम बसविला आहे आणि परिमाणी स्नॅपडीलला नुकसान होत आहे. मात्र स्नॅपडीलच्या दाव्यानुसार त्यांचे ४० कोटी ग्राहक असून प्रथमच ते ऑनलाईन शॉपिंगला पसंती देत आहेत. अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या आक्रमक स्पर्धेमुळे स्नॅपडीलची पीछेहाट होऊन महसूल घटला होता. २०१८ मध्ये कंपनीचा महसूल घटून ५३५३ कोटींवर आला होता मात्र आता त्यात १२ महिन्यात ७३ टक्के वाढ झाली असून नुकसान कमी होऊन ६११ कोटींवरून १८६ कोटींवर आले आहे. नुकसानीतील ही घट ७१ टक्के आहे असे समजते.

Leave a Comment