पुलवामा, सुंदर पर्यटनस्थळ


गेली काही दशके जम्मू काश्मीर मधील पुलवामा हे दहशतवाद, आतंकवाद कारवाया होणारे ठिकाण बनले आहे आणि त्यामुळे ही जागा अगदी सुनसान आणि भयंकर असेल अशी प्रतिमा अनेकांच्या डोळ्यासमोर येत आहे. मात्र पुलवामाची ओळख इतकीच नाही कारण जम्मू काश्मीर मधले ते एक नितांतसुंदर, रमणीय स्थळ सुद्धा आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरच्या ट्रीपला जाणार असला तर पुलवामा येथे अवश्य भेट द्या.


झेलम नदीच्या काठी वसलेले हे ठिकाण घनदाट जंगल, सर्वस्वाचा विसर पडायला लावणारी अनेक सुंदर स्थळे, प्राचीन मंदिरे, खळाळते प्रपात, अवखळ झरे आणि चोहोबाजूंनी हिरवाई असे चित्रात रेखाटावे तसे रमणीय ठिकाण आहे. शतकानुशतके येथे महादेव आणि विष्णू पूजा केली जात असून त्यासाठी प्रसिद्ध अवंतीश्वर मंदिराला भेट द्यायला हवी. हे प्राचीन मंदिर आता भग्नावस्थेत असले तरी येथील खांबांवर रेखलेली सुंदर शिल्पे आवर्जून पाहायला हवीत. हे मंदिर सध्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. दाट जंगलात असलेल्या या मंदिराला स्थानिक पायेक मंदिर या नावाने ओळखतात. १० व्या शतकात हे मंदिर बांधले गेले होते.


अहरबल नावाचे एक ठिकाण सुंदर झरे पाहण्यासाठी प्रसिद्ध असून तेथील देवदार आणि पाईन वृक्ष असलेली दाट जंगले तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. समुद्रसपाटीपासून २१३० मीटर उंचीवरचे शिकारगढ असेच शेकडो प्रकाराच्या वनस्पती अंगावर बाळगून आहे. प्राचीन काळी राजे महाराजे येथे शिकारीसाठी येत असत. रस्त्यातून जाताना अखंड वाहणारे झरे, सुंदर धबधबे हा सारा प्रवास मोठा आनंदाचा करून टाकतात.

Leave a Comment