सुंदर फुलणाऱ्या बगीच्यासाठी आजमावा या सोप्या टिप्स


घरामध्ये किंवा घराच्या आसपास सुंदर फुलणारी बाग असावी असे कोणाला वाटत नाही? पण आजकाल जागेच्या अभावी घराच्या आसपास बाग फुलविण्यासाठी मोकळी जागा अभावानेच मिळत असल्याने हौशी मंडळी आपापल्या घराच्या बाल्कनींमध्ये किंवा घरांच्या गच्च्यांवरच लहानशी बाग फुलवून आपली हौस भागवून घेत असतात. मात्र बागेमध्ये अगदी थोडी फुलझाडे जरी असली, तरी त्यांची व्यवस्थित निगा राखणेआवश्यक असते. त्यामुळे आपली लहानशी बाग देखील हिरवीगार आणि सुंदर दिसत राहते. यासाठी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या अनेक वस्तू वापरून आपल्याला घरातील फुलझाडांची निगा राखता येऊ शकते.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या घरातील फुलझाडांवर अनेकदा काळसर रंगाची बुरशी दिसून येऊ लागते. झाडाला लागलेली ही काळसर बुरशी नष्ट करण्यासाठी आपल्याला दुधाचा वापर करता येऊ शकतो. यासाठी आपल्याला स्किम्ड मिल्क, म्हणजेच फॅट्सचे प्रमाण अगदी नगण्य असलेले दुध वापरायचे आहे. जितके दुध आपण घ्याल, त्याच्या दहापट जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे. म्हणजेच एक मोठा चमचा स्किम्ड दुध घेतल्यास त्यामध्ये दहा मोठे चमचे पाणी मिसळायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊन एका स्प्रे बॉटलमध्ये भरावे आणि ज्या झाडावर बुरशी आली असेल, त्या ठिकाणी हे मिश्रण फवारावे. या मिश्रणाच्या वापराने बुरशी नष्ट होते.

अनेकदा आपल्या फुलझाडांवर कोळ्यांची जाळी होऊ लागतात, किंवा पांढरे लहान लहान किडे दिसून येतात. ही कीड किंवा सतत लागणारी कोळ्यांची जाळी नाहीशी करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये दीड मोठा चमचा कडूलिंबाचे तेल मिसळावे. त्यामध्ये अर्धा चमचा सौम्य लिक्विड सोप किंवा हेअर शँपू घालावा. कडूलिंबाचे तेल पाण्यामध्ये एकजीव होऊ शकत नसल्याने यामध्ये शँपू किंवा लिक्विड सोपचा वापर करावयाचा आहे. हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊन स्प्रे बॉटलमध्ये भरावे आणि ज्या ठिकाणी जाळी किंवा कीड दिसत असेल, त्या ठिकाणी हे मिश्रण फवारावे. जर कीड जास्त असेल, तर लागोपाठ तीन ते चार दिवस हे मिश्रण झाडांवर फवारावे. ज्या झाडावर कीड दिसून आली असेल त्यावर आणि त्या झाडाच्या आसपासच्या झाडांवरही हे मिश्रण फवारावे. जर या मिश्रणाने कीड कमी झाली नाही, तर या मिश्रणामध्ये रोजमेरीचे तेल (एक लिटर पाण्यामध्ये तीन ते चार थेंब)घालावे आणि ते मिश्रण झाडांवर फवारावे.

फुलझाडांवर काळ्या रंगाचे किडे दिसून येऊ लागल्यास त्यासाठी फ्रीजमधले अतिशय थंड पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यावे. हे पाणी झाडाच्या फाद्यांवर फवारावे. या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकराची रसायने समाविष्ट नाहीत. थंड पाणी लागोपाठ तीन ते चार दिवस झाडांवर फवारल्याने काळे किडे नष्ट होतात. बागकाम करत असताना, विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूपदा डास चावतात. या डासांमुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होण्याचाही धोका असतो. डासांपासून संरक्षण मिळविण्यासाठी एक ग्लास स्वच्छ पाण्यामध्ये तीन ते चार थेंब कापराचे तेल घालावे. हे तेल बाजारामध्ये सहज उपलब्ध असते. हे तेल पाण्यामध्ये घालून चांगले एकजीव होईपर्यंत मिसळावे आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून आपला झाडांच्या आसपास फवारावे. हे मिश्रण फवारल्याने डासांचा प्रादुर्भाव होत नाही. हे मिश्रण झाडांसाठी संपूर्णपणे सुरक्षित आहे. झाडांच्या बरोबरच आपल्या घरामध्येही हे मिश्रण फवारल्याने घरातील डास नाहीसे होतील.