शहीद औरंगजेबचे दोघे भाऊ भारतीय सेनेत दाखल


गतवर्षी श्रीनगरच्या शोपिया भागात दहशतवाद्यांनी ईदच्या सुटीसाठी घरी परतत असलेल्या सेनेतील जवान औरंगजेब याचे अपहरण करून त्याला ठार केले होते. याच शहीद औरंगजेबचे दोघे लहान भाऊ भारतीय सेनेत दाखल झाले आहेत. पिता मोहम्मद हनीफ यांनी हे दोघे देशसेवेसाठी बलिदान करण्यास तयार झाले असल्याचे सांगून तिसरा भाऊ असन यालाही भारतीय सेनेतच दाखल व्हायचे आहे असे सांगितले.

लष्करात दाखल झालेल्या मोहम्मद तारिक आणि मोहम्मद शब्बीर यांचे प्रशिक्षण सध्या सुरु आहे. ते म्हणाले आमच्या भावाने, औरंगजेबने मातृभूमीसाठी प्राण दिले. त्याच्या हत्येचा बदला घेण्यास आम्ही तयार झालो आहे. आम्हालाही भारताचे नाव रोशन करण्याची इच्छा आहे.

औरंगजेब गतवर्षी ईद साजरी करण्यासाठी सुट्टी घेऊन घरी येत होता तेव्हा दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करून माहिती मिळविण्यासाठी त्याचा अमानुष छळ केला होता व अखेर त्याला गोळ्या घालून ठार केले होते. त्याचे शव पुलवामा येथे मिळाले होते. तो पूंछचा राहणारा होता. त्याच्या अंतिम संस्काराला मोठी गर्दी जमली होती. त्याचे काका सुद्धा २००४ मध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना शहीद झाले होते.

Leave a Comment