या एकमेव मंदिरात पूजले जाते खंडित शिवलिंग


श्रावण महिन्यात शिवपूजेचे महात्म्य मोठे आहे. सनातन हिंदू धर्मात मूर्ती पूजा केली जाते मात्र भंगलेली अथवा खंडित झालेली मूर्ती पुजली जात नाही. भारतात मध्यप्रदेश राज्यातील सतना येथून ३५ किमीवर असलेले प्रसिध्द शिवमंदिर मात्र याला अपवाद आहे. गैबीनाथ मंदिर नावाने प्रसिद्ध असलेल्या या प्राचीन मंदिरात खंडित शिवलिंगाची पूजा होते. श्रावणात येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. येथे शिवलिंगावर जलाभिषेक करणाऱ्या भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे.

पद्मपुराणाच्या पाताळखंडात या शिवलिंगाचे उल्लेख आहेत. त्रेता युगात राजा वीरसिंग नावाचा राजा राज्य करत होता. त्यावेळी सध्याच्या या बिरसिंगपुर नगराचे नाव देवपूर असे होते. हा राजा उज्जैनचा महाकालेश्वर महादेवाला जल अपर्ण करण्यासाठी रोज घोड्यावरून जात असे. कालांतराने तो म्हातारा झाला तेव्हा उज्जैनला जाणे त्याला शक्य होईना तेव्हा शिवाने त्याल स्वप्नात येऊन देवपूर येथे माझी पूजा कर असा दृष्टांत दिला.


या गावात गैबी यादव नावाच्या माणसाच्या घरात दररोज रात्री चुलीतून शिवलिंग बाहेर येत असे. मात्र त्याची आई ते मुसळाने पुन्हा चुलीत ढकलत असे. अनेक दिवस हा प्रकार सुरु होता. तेव्हा महाकाल महादेवाने राजाच्या स्वप्नात ‘ मला तुझ्या नगरात यायचे आहे पण गैबी यादव येऊ देत नाही’ असे सांगितले. राजाने गैबिला बोलावले आणि स्वप्न सांगितले तेव्हा शिवलिंग निघाले ती जागा रिकामी केली गेली आणि तेथेच राजाने भव्य मंदिर बांधले. महाकालाने सांगितल्यानुसार या शिवलिंगाला गैबीनाथ असे नाव पडले. उज्जैनचा महाकालेश्वर दर्शनाने जेवढे पुण्य मिळते तेवढेच या गैबीनाथाच्या दर्शनाने मिळते असे सांगितले जाते.