इम्रान खान यांना अमेरिकेत दुय्यम वागणुक


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अजेंड्यामध्ये आतंकवाद, अफगाणिस्तानमध्ये शांती आणि भारताबरोबर चर्चा हे मुद्दे आहेत. मात्र ज्याप्रमाणे विमानतळावर इम्रान खान यांचे स्वागत झाले आहे त्यावरून असे वाटत आहे की, अमेरिकेने इम्रान खान यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व दिलेले दिसत नाही. पैसे वाचवण्यासाठी त्यांच्या मोहिमेच्या अंतर्गत त्यांनी पंतप्रधान कार्यालयातील गाडी पासून ते म्हैस देखील विकली. आता अमेरिकेचा दौरा कमी खर्चात व्हावा यासाठी ते कमर्शियल फ्लायइटने तेथे पोहचले आहेत. यामुळे सरकारी पाहुण्यांना विमानतळावर मिळणारे स्वागत देखील त्यांना मिळाले नाही. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.

देश आर्थिक संकटात असल्यामुळे पंतप्रधान विशेष विमानाने येण्याऐवजी  कतार एअरवेजच्या विमानाने वॉशिंग्टनला पोहचले. मात्रा विमानतळावर अमेरिकेचा कोणताच महत्त्वाचा अधिकारी तेथे उपस्थित नव्हता.  अमेरिकेच्या सरकारची कोणती गाडी देखील त्यांना घ्यायला आली नाही. त्यामुळे त्यांना सामान्य नागरिकांप्रमाणे मेट्रोने प्रवास करावा लागला. इम्रान खान यांच्या या अमेरिकन दौऱ्यावर आता सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे. मात्र जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्विट केले. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘त्यांनी आपल्या देशाचे पैसे वाचवले आहेत. या प्रकरणात बाकीचे नेता दाखवतात तसा अंहकार नाही दाखवला. त्यामुळे मला सांगा की, हे चुकीचे कसे ? या सर्व गोष्टींमुळे अमेरिकन सरकारची प्रतिमा खराब होत आहे. इम्रान खान यांची नाही.’

सध्या इम्रान खान तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून, ते पाकिस्तानच्या राजदूतांच्या घरातच राहणार आहेत. त्यांची अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होणार असून, त्यामध्ये रक्षा, व्यापार आणि कर्ज या गोष्टींवर चर्चा होणार आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या भूमिकेविषयी देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे. याशिवाय ट्रम्प यांनी, पाकिस्तानने धोक्याशिवाय काहीही दिले नसल्याचे विधान केले होते. त्यामुळे आतंकवाद आणि अफगाणिस्तान मुद्दांवर चर्चा होऊ शकते.