
नवी दिल्ली : भारताने आज अंतराळात नवा इतिहास रचला असून चांद्रयान 2 भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो)ने केलेल्या नियोजनानुसार यशस्वीपणे अवकाशात झेपावले. चांद्रयान 2ने GSLV मार्क III-M1 या प्रक्षेपकाच्या मदतीने उड्डाण केले. भारताचे GSLV मार्क III-M1 हे सर्वात मोठे प्रक्षेपक यान आहे. याचे काऊंटडाऊन रविवारी संध्याकाळी 6.43 वाजल्यापासून सुरू झाले होते. या यानाने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून उड्डाण केले. यानाची गती आणि दिशा योग्य असल्याची माहिती इस्रोने दिली आहे.
अखेर अवकाशाच्या दिशेने झेपावले चांद्रयान-2
इस्रोच्या इंजिनिअर्सनी यानात बिघाड झाल्यानंतर अवघ्या 24 तासात तांत्रिक बिघाड शोधून काढून तो दुरुस्त केला. त्यानंतर त्याची काही दिवस चाचणी घेतली गेली आणि नंतर यान उड्डाणासाठी सज्ज केले गेले. दिवस रात्र जी कठोर मेहनत शास्त्रज्ञांनी घेतली त्या मेहेनतीचे हे फळ असल्याची प्रतिक्रिया इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी व्यक्त केली आहे.
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी गेल्या आठ दिवसांमध्ये दिवस रात्र मेहनत करून झालेला तांत्रिक बिघाड दुरूस्त केला आणि अतिशय कमी वेळात यानाला उड्डाणासाठी सज्ज केले. या मोहिमेत इस्रोने काही बदल केले असून यानाचा प्रवास 6 दिवसांनी कमी केला आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून अवकाश झेपावल्यानंतर 52 दिवसांनी चांद्रयान 2 चंद्रावर पोहोचेल. यानंतर ते 16 दिवस पृथ्वीची परिक्रमा करून चंद्राच्या दिशेने रवाना होईल.
सोमवारी 15 जुलै रोजी काही तांत्रिक कारणामुळे चांद्रयान 2 चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्यात आले होते. चांद्रयान -2 ही मोहीम ठरलेल्या वेळेनुसार पहाटे 2 वाजून 51 मिनिटाला झेपवणार होती. यासाठी काउंटडाऊनही सुरू झाले होते. पण 56 मिनिटे 24 सेकंद प्रत्यक्ष प्रक्षेपणाला उरले असताना काही तांत्रिक दोष निर्माण झाला आणि प्रक्षेपण स्थगित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा इस्त्रोच्या वतीने करण्यात आली.
