आनंद महिंद्रांचा मोटारसायकल पार्किंगसाठी नवा ‘फंडा’


ट्विटरवर महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा नेहमीच सक्रिय असतात. ते विविध उपाय किंवा अन्य अनेक बाबी या माध्यमातून शेअर करत असतात. त्यांनी ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी एका लहान मुलीने सुचवलेला उपाय काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरच्या समोर एक खाट लावलेला व्हिडिओ शेअर करुन याचा वापर अनेक कामांसाठी करता येतो असा संदेश दिला होता आणि पुन्हा एकदा असाच एक पार्किंगच्या समस्येबाबत फोटो आता त्यांनी शेअर केला आहे.


काही दिवसांपूर्वी एका महिलेने कंपनीच्या बोर्ड मिटिंगमध्ये प्लास्टिकच्या बॉटलचा वापर न करण्याचे आवाहन महिंद्रांना केले होते. त्या महिलेचे म्हणणे ऐकत महिंद्रांनीही प्लास्टिकचा वापर करणार नाही असे जाहीर केले होते. पण त्यांनी आता एक फोटो ट्विट करुन प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले आहे. महिंद्रांनी या फोटोसोबत माझ्या ऑफिसमध्ये मी प्लास्टिकच्या बाटल्यांवर बंदी घातली आहे. अपेक्षा आहे की आजूबाजूच्या अनेक प्लास्टिक उत्पादनांनाही हे लागू होईल. पण काही लोक प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी असे भन्नाट प्रयोग करत आहे हे पाहून छान वाटते, असे त्यांनी ट्विट केले आहे.

एका पाण्याच्या प्लास्टिकच्या टाकीला कापून तिचा उपयोग दुचाकी पार्क करण्यासाठी महिंद्रांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये करण्यात आला आहे. गाडी पावसाळ्याच्या दिवसात बाहेर उभी केल्यास अनेकदा गाडीला गंज लागणे किंवा तिचे इलेक्ट्रॉनिक भाग खराब होण्याचे प्रमाण वाढते. महिंद्रा यांनी त्यावर सुचवलेला उपाय चांगलाच परिणामकारक आहे. एकप्रकारे प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यावरही महिंद्रा यांनी भर दिला असून महिंद्रा यांच्या या नव्या आवाहनाचे सोशल मीडियावर चांगलेच कौतुक होत आहे.

Leave a Comment