अभिनेत्री कोएना मित्राला आर्थिक फसवणूक प्रकरणी 6 महिन्याचा तुरुंगवास


मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने अभिनेत्री कोएना मित्राला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. कोएनाला ही शिक्षा एका चेक बाउंसिंग प्रकरणी सुनावण्यात आली आहे. मॉडेल पूनम सेठीने याआधी केलेल्या तक्रारीनंतर कोएनाला कोर्टाने 1.64 लाख रुपये व्याजाच्या रकमेसह 4.64 लाख एवढी रक्कम पूनमला देण्याचे आदेश दिले होते.

2013 मध्ये कोएनाच्या विरोधात मॉडेल पूनम सेठीने तक्रार केली होती. पण कोएनाचा चेक फंड नसल्याने बाऊंस झाला होता. आता याच चेक बाऊंस प्रकरणी कोएनाला कोर्टाने 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे. पण हे सर्व आरोप कोएनाने फेटाळले असून या निकालबाबत तिने उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.

कोएना कडून मांडण्यात आलेले सर्व युक्तीवाद खोडून काढत मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने आपला निर्णय सुनावला. केसनुसार, वेगवेगळ्या वेळी कोएनाने जवळपास 22 लाख रुपये घेतले होते. कोएनाने पूनमला ही रक्कम परत कराताना ३ लाखाचा चेक दिला होता. जो बाउंस झाला. पूनमने या प्रकरणानंतर कोएनाला कायदेशीर नोटीस पाठवली. कोएनाने त्यानंतरही रक्कम परत न केल्यामुळे 10 ऑक्टोबर 2013ला पूनमने कोएनाच्या विरोधात केस दाखल केली. कोएनाने या सुनावणी दरम्यान हे सर्व आरोप फेटाळत पूनमची आर्थिक परिस्थितीच अशी नाही की, ती कोणाला 22 लाख रुपये देऊ शकेल असे म्हटले होते. याशिवाय पूनमने चेक चोरल्याचा आरोपही तिने केला होता. पण कोएनाने केलेले हे सर्व आरोप कोर्टने फेटाळून लावत तिला आता 6 महिन्याचा तुरुंगवास ठोठावला आहे.

Leave a Comment