उस्मानाबाद येथे पडणार 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन


मुंबई – उस्मानाबाद येथे 2020 मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पार पडणार आहे. 93 वे 2020 मधील संमेलन असणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच संमेलनाच्या अंतिम तारखा ठरवल्या जाणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा या संमेलनाचे आयोजन करणार आहे.

मराठवाड्याचे प्रवेशद्वार अशी ओळख गेले अनेक वर्षे असलेल्या उस्मानाबाद येथे साहित्य संमेलन घ्यावे अशी मागणी करण्यात येत होती. पण मंडळाने प्रत्येकवेळी मोठ्या शहरांना प्राधान्य दिले. अखेर आता 2020 च्या साहित्य संमेलनाच्या यजमानापदाचा मान उस्मानाबादला मिळाला आहे. बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद अशा चार शहरांमध्ये अंतिम ठिकाणासाठी स्पर्धा रंगली. शेवटी उस्मानाबादवर 20 जणांच्या सहमतीने शिक्कामोर्तब करण्यात आले.

याआधी उस्मानाबादला यजमानपद देणे आर्थिक आणि पाण्याच्या मुद्द्यावरून टाळले होते. पण अगदीच वेळ पडली तर पिठले-भाकरी खाऊन साहित्य संमेलन पार पाडू असे कौतिकराव ठाले पाटील म्हणाले. आता संमेलनाध्यक्ष कोण होईल याचा मुद्दा रंगणार आहे. वाद आणि साहित्य संमेलन यांचे नाते पाचवीलाच पूजले आहे. यवतमाळ येथे यावर्षीच्या पार पडलेल्या साहित्य संमेलनाला फार मोठे गालबोट लागले. जो वाद निर्माण झाला त्यामुळे अनेक लेखकांनी त्या संमेलनावर बहिष्कार टाकला होता. मात्र उस्मानाबादचे साहित्य संमेलन वादाशिवाय पार पडेल, असा विश्वास ठाले यांनी व्यक्त केला.