म्हैस गाभण राहिल्याचा राज्यात जल्लोष


छत्तिसगढ राज्यात सध्या एक जंगली म्हैस गाभण राहिल्याचा जल्लोष केला जात आहे मात्र त्याला कारणही तसेच आहे. जंगली म्हैस हा छत्तिसगढचा राज्य पशु आहे मात्र ही प्रजाती सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाइल्ड वॉटर बफेलो या प्रजातीची ही म्हैस या महिनाअखेरी अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विणार आहे आणि तोपर्यंत वनाधिकारी तिची सर्वतोपरी काळजी घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार छत्तिसगढमध्ये उदंती अभयारण्यात या प्रजातीच्या केवळ ८ म्हशी असून त्यातील दोन माद्या आहेत आणि बाकी रेडे आहेत. या दोन म्हशींना आशा आणि ख़ुशी अशी नावे दिली गेली आहेत. त्यातही आशा म्हातारी बनली असल्याने तिला वासरे होऊ शकत नाहीत. म्हणजे नवीन वासरू जन्माला येण्याची शक्यता फक्त ख़ुशी मुळेच आहे. ख़ुशी गाभण असल्याने जल्लोष साजरा करण्याचे हे महत्वाचे कारण आहे. खुशीच्या आरोग्याची सर्व काळजी राज्यातील प्राणीप्रेमी आणि वनविभाग घेत आहे. गेल्या तीन दशकात या प्रजातीच्या प्राण्यांची संख्या ५० टक्के घटली आहे त्यामुळे ही संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्राणी डॉक्टर खुशीचे वारंवार चेकअप करत आहेत आणि तिचे बाळंतपण सुखरूप आणि यशस्वी व्हावे यासाठी जागरूक आहेत असेही समजते.

Leave a Comment