लेफ्ट.कर्नल धोनीला आर्मीसह प्रशिक्षणाची परवानगी


टीम इंडियाचा माजी कप्तान, विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी याला आर्मी सह प्रशिक्षण घेण्यास सेनाप्रमुख बिपीन रावत यांनी रविवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे धोनी आता दोन महिने आर्मी प्रशिक्षण घेणार असून त्याच्या प्रशिक्षणाचा बराचसा भाग जम्मू काश्मीर मध्ये पार पडणार आहे असे समजते.

इंग्लंड मध्ये झालेल्या वर्ल्ड कप नंतर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे धोनीने बीसीसीआयला कळविले होते. त्याऐवजी तो दोन महिने आर्मी प्रशिक्षण घेणार आहे. धोनीला टेरेटोरीयल आर्मीच्या पॅराशूट रेजिमेंट मध्ये या पूर्वीच लेफ्ट. कर्नलचा हुद्दा दिला गेला आहे. याच रेजिमेंट मध्ये धोनी प्रशिक्षण घेणार आहे. यापूर्वी त्याने पॅरा ट्रेनिंग घेतलेले आहे. आता दोन महिने तो रेजिमेंट बरोबर काम करणार आहे मात्र त्याला अॅक्टिव्ह ऑपरेशन मध्ये घेतले जाणार नाही असे स्पष्ट केले गेले आहे.


धोनीचे आर्मी प्रेम लपलेले नाही. आर्मी बॅग बद्दलचे त्याचे प्रेम वर्ल्ड कप मध्ये दिसले होतेच पण बलिदान बॅज लोगो असलेले ग्लोव्स त्याने घातल्याने त्यावरून वादंगही झाले होते. धोनीला २०११ मध्ये टेरेटोरीयल आर्मी मध्ये हुद्दा दिला गेला असून पॅरा आर्मी अंतर्गत ९ स्पेशल फोर्स, दोन टेरेटोरीयल आर्मी, एक राष्ट्रीय रायफल बटालियन आहेत.