साकीनाका किंवा नालासोपाऱ्यातून निवडणूक लढवणार प्रदीप शर्मा ?


ठाणे – मुंबई पोलीस दलात असताना सर्वाधिक एनकाउंटर करणारे ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी बुधवारी पोलीस दलातील सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला. लवकरच राजकारणात तब्बल 113 गुंडांचा एन्काऊंटर करणारे शर्मा प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ते अंधेरी, साकीनाका नाहीतर नालासोपारा येथील विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

1983 मध्ये पोलीस दलात प्रदीप शर्मा दाखल झाले होते. मुंबईतील गुन्हे शाखा अथवा विशेष दलात त्यांचा बहुतांश कार्यकाळ हा गेला आहे. ते दोन वर्षांपासून ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. सहा महिन्यानंतर शर्मा निवृत्त होणार होते. पण त्यांनी त्यापूर्वीच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यानेच राजीनामा दिल्याचे कळते. शर्मा यांनी ४ जुलै रोजी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज केला होता. त्यांचे युतीमधील अनेक वरिष्ठ नेत्यांबरोबर सलोख्याचे संबंध असल्याने त्यांचा राजकारणप्रवेश सुकर मानला जात आहे.

शर्मा यांनी लष्करे ‘तोयबा’च्या तीन दहशतवाद्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुप्रसिद्ध गुंडांचा एन्काऊंटर केला होता. त्यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी एका खंडणी प्रकरणात थेट कुप्रसिद्ध दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्‍बाल कासकर यालाही अटक केली होती.

त्यांचे अंधेरी आणि साकीनाका परिसरात सामाजिक कामे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या दोनपैकी एका मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. मात्र, त्याचवेळी युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवताना त्यांना नालासोपाऱ्यातूनही संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. वसई व नालासोपारा परिसरात आमदार हितेंद्र ठाकूर यांचे एकहाती वर्चस्व आहे. या वर्चस्वाच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना आमदार क्षितिज ठाकूर यांच्याविरोधात युतीकडून संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी मुंबईचे आयुक्त म्हणून काम केलेल्या सत्यपाल सिंह यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यापाठोपाठ आता शर्माही राजकारणाच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.

Leave a Comment