अशी आहे ‘मोमोज किंग’ची यशोगाथा


कोणताच धंदा हा छोटा अथवा मोठा नसतो आणि धंद्यापेक्षा मोठा कोणताच धर्म नाही. एका व्यक्तीने हा प्रसिध्द डॉयलॉग सत्यात उतरवला आहे. एका साध्या ठिकाणापासून ते देशातील अनेक मोठमोठ्या शहरात ‘मोमो’ची चेन चालवणाऱ्या या व्यक्तीचे नाव रंजीत सिंह आहे. रंजीत सिंह ‘नैनीताल मोमोज’चे मालक आहेत.

रंजीत सांगतात की, आयुष्य जगण्यासाठी पैसे खूप महत्त्वाचे असतात हे लहानपणापासूनच आम्हाला माहित आहे. याचे कारण गरीबी होते. उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथे येणाऱ्या नलाई तल्ली या गावात जन्म झाला.  वडिल आमच्या सर्वांच्या गरजा पुर्ण करण्याचा पुर्ण प्रयत्न करत असे, मात्र अनेक वेळा त्यांना त्यात अपयश येत असे. मिठाई आणि नवीन कपडे या गोष्टी आमच्यासाठी स्वप्न होत्या. आयुष्य एकप्रकारे ओझं झालं होतं.

रंजीत सिंह सांगतात, मला वाटलं मी सुध्दा जर गावात राहिलो तर मला देखील असेच आयुष्य काढावे लागेल. आई-वडिलांचा आशिर्वाद घेतला. आई म्हणाली, बाळा जे काही करशील ते मेहनतीने आणि ईनामदारीने कर. गावाचे आणि कुटूंबाचे नाव खराब करू नकोस. हीच गोष्ट घेऊन 1997 ला मी लखनऊला आलो. अनेक जागी फिरलो, लोकांकडे गेलो मात्र कोणीच काम दिले नाही. अखेर देवाला माझ्यावर दया येऊन, एका ठिकाणी हेल्परचे काम मिळाले. एवढे कमी पैसे मिळत होते की, त्यात दिवस काढणे अवघड होते. अखेर एका ठिकाणी वेटरचे काम मिळाले. या ठिकाणी पगार आधी पेक्षा चांगला होता आणि मोफतमध्ये जेवण देखील मिळत होते. अनेक महिने पैसे साचवून ते घरी पाठवून द्यायचो. याच दरम्यान माझ्याबरोबर काम करणाऱ्या एकाचे काम करताना हात भाजले. मालकाने सहानभुती दाखवणे तर सोडाच, भाजलेल्या हाताने दुसऱ्याला जेवण कसे वाढणार असे म्हणत कामावरून काढून टाकले. मी ते बघून घाबरलो आणि काम सोडून प्राणीसंग्रहालयासमोर स्वतःची पुरी –भाजीची गाडी टाकली.  सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत केवळ 40 रूपयांची कमाई झाली. मला समजले होते हे चालणार नाही. त्याच चाळीस रूपयांनी चाऊमीन आणि त्यात असणाऱ्या भाज्या विकत घेऊन चाऊमीनची गाडी सुरू केली. यावेळी राणा प्रताप मार्गावर दुकान सुरू केले. हे काम करत असताना मी मार्केट रिसर्च देखील केले. मला समजले की, खूप कमी लोक असे आहेत ज्यांना मोमोज बद्दल माहित आहे. माहित नाही का, पण 2008 मध्ये मी चाऊमीन सोबत मोमो विकण्यास सुरूवात केली. सुरूवातीला मोमोचा स्वाद लोकांना आवडत नव्हता. खुप कमी लोक याची मागणी करत होते. त्यावेळी मी यात बदल करण्यास सुरूवात केली. फ्राइड मोमो, सुपमध्ये असलेले मोमो असे वेगवेगळे काही बनवण्यास सुरूवात केली जे लोकांना काहीप्रमाणात तरी आवडत होते.

शेवटी गोमती नगरमध्ये एक छोटेसे दुकान घेतले. लोकांची आवड बघून स्टीमबरोबरच, तंदूरी मोमो विकण्यास सुरूवात केली. त्यानंतर ड्रॅगन फायर, चीज, चॉकलेट सारख्या प्रकारात मोमो विकण्यास सुरूवात केली. प्रत्येक ग्राहकाला विचारायचो की, असे काय करू जे तुम्हाला अधिक आवडेल. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा विचार करायचो. आज जवळपास 54 प्रकारचे मोमो आहेत. यामध्ये नवनवीन बदल करत आहोत. एवढेच नाही, जर एखाद्या ग्राहकाने ऑर्डर केल्यावर त्याला जर आवडले नाही तर ऑर्डर परत करून त्यांना हवे तशी ऑर्डर देऊ शकतात. माझे म्हणणे आहे की, लोकांचे प्रेमच माझ्यासाठी सर्वकाही आहे. त्यांच्यामुळेच आज लखनऊमध्ये चार आउटलेट आहेत. गोवा, कानपूर, अलाहाबाद सारख्या शहरात फ्रेंचाइजी आहे. याशिवाय पुढील महिन्यात दिल्ली, गोरखपूर, बनारस आणि रांचीमध्ये देखील फ्रेंचाइजी सुरू होणार असल्याचे रंजीत कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment