पूर्ण जेवण एक किलो प्लास्टिकचा कचरा आणि अर्धा किलो दिल्यास मिळणार नाश्ता


सध्याच्या काळातील प्लास्टिकमुळे पर्यावरणाची होणारी हानी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोज लाखो टन प्लास्टिकचा कचरा भारतासारख्या देशामध्ये निर्माण होतो. पण या कचऱ्याची विल्हेवाट लावणे म्हणजे अवघड काम असते. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामधून अनेकदा प्लास्टिक गोळा करुन पोटाची खळगी भरणारे लोक आपल्याला दिसतात. पण त्यांना दिवसभर कष्ट करुनही अनेकदा जेवणापुरते पैसेही मिळत नाही. पण चंढीगडमध्ये देशातील पहिले ‘गार्बेज रेस्टॉरंट’ प्लास्टिकचा कचरा गोळा करुन पर्यावरण संवर्धानला हातभार लावणाऱ्या याच कचरावेचक मुलांना पुरेसे अन्न मिळावे म्हणून सुरु करण्यात आले आहे. कचरा गोळा करणाऱ्या मुलांना या रेस्टॉरंटमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या मोबदल्यात महापालिकेमार्फत मोफत जेवण दिले जाणार आहे.

देशातील दुसरे सर्वात स्वच्छ शहर म्हणून चंढीगडमधील सुरगुजा जिल्ह्यातील अंबिकापूर हे शहर असून ‘गार्बेज रेस्टॉरंट’ याच शहरामध्ये हे सुरु करण्यात आले आहे. प्लास्टिकचा एक किलो कचरा देणाऱ्याला संपूर्ण जेवण तर ५०० ग्राम कचरा देणाऱ्यांना नाश्ता या रेस्टॉरंटमध्ये देण्यात येणार आहे.

रस्ते बांधण्यासाठी अंबिकापूर महानगरपालिका हे प्लास्टिक वापरणार आहे. शहरातील प्रमुख बसस्टॉपजवळ या रेस्टॉरंटसाठी कचरा गोळा करण्याचे काम केले जाईल, अशी माहिती शहराचे महापौर अजय तिरकी यांनी शहराचा अर्थसंकल्प मांडताना दिली. अर्थसंकल्पामध्ये पाच लाख रुपयांचा निधी या ‘गार्बेज रेस्टॉरंट’साठी पालिकेने दिला आहे. याच कचरा गोळा करणाऱ्यांना मोफत राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्याचा पालिकेचा विचार आहे.

या आधीच प्लास्टिक वापरून अंबिकापूर शहरामध्ये रस्ते बांधण्यात आले आहेत. आठ लाख प्लास्टिकच्या पिशव्या आणि सल्फेट वापरून तयार करण्यात आलेला रस्ता हा डांबरी रस्त्याइतकाच टिकाऊ असून सल्फेटमुळे या रस्त्यामध्ये पाणी मुरत असले तरी त्याचा रस्त्यावर परिणाम होत नाही. अंबिकापूरमध्ये सध्या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही ‘गार्बेज रेस्टॉरंट’ योजना शहरामध्ये योग्य पद्धतीने राबवण्यात येईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment