भारतामध्ये लवकरच लागू होणार नेटफ्लिक्सचे नवीन आणि स्वस्त प्लॅन्स


नवी दिल्ली – सध्या मनोरंजन क्षेत्रात अॅप्स आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग वेबसाईट्सची चर्चा आहे. आज अनेकजण नेटफ्लिक्स, हॉटस्टार, झी फाइव्ह, अॅमेझॉन प्राइम यासारख्या अॅप्सच्या माध्यमातून नवीन विषयांवरील चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेताना दिसत आहेत. पण असे असले तरी अनेकजणांना या अॅप्स आणि सेवांचे सबक्रिप्शन या सेवांचे दर परवडणारे नसल्याने इच्छा असूनही घेत नाहीत. नेटफ्लिक्सने हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या दरमहा पॅकेजचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त भारतीय युझर्ससाठी ही सेवा असणार आहे.

नेटफ्लिक्सची भरपूर मागणी भारतामध्ये आहे पण यासाठी मोजावे लागणारे पैसे अधिक असल्याने तीन ते चार जण मिळून अनेकदा एक सबस्क्रीप्शन घेताना दिसत असल्यामुळेच नेटफ्लिक्सचे सबक्रिप्शन जास्तीत जास्त लोकांनी घ्यावे आणि भारतामधील नेटफ्लिक्स युझर्सची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने नेटफिक्सने दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने हे नवीन दर कधी लागू होणार याबद्दल अद्याप कोणताही माहिती दिली नसली तरी या तिमाहीमध्ये भारतीयांसाठीचे नवीन आणि स्वस्त प्लॅन्स उपलब्ध करुन दिले जातील अशी माहिती समोर येत आहे. नेटफ्लिक्सवर सध्या कमीत कमी ५०० रुपये दरमहापासून प्लॅन उपलब्ध आहे.

नेटफ्लिक्सचे कार्यकारी अधिकारी रेड हॅस्टींग्स याचसंदर्भात बोलताना म्हणतात, आम्ही भारतीय युझर्सचा मागील अनेक महिने अभ्यास केल्यानंतर मोबाइलवरुन नेटफ्लिक्स पाहणाऱ्या भारतीय युझर्ससाठी आम्ही सध्याच्या प्लॅन्सबरोबर नवीन प्लॅन्स बाजारात आणणार आहोत. हे प्लॅन्स युझर्सला तिसऱ्या तिमाहीमध्ये उपलब्ध करुन दिले जातील. नेटफ्लिक्सला या प्लॅन्समुळे भारतामधील युझर्सची संख्या वाढवण्यास तसेच भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यास मदत होईल अशी आम्हाला आशा आहे. पे टीव्ही सारख्या सेवा भारतासारख्या बाजारामध्ये ५ डॉलरहून कमी किंमतीमध्ये उपलब्ध असल्याचे पहायला मिळते. हे प्लॅन लॉन्च केल्यानंतर त्याला कसा प्रतिसाद मिळतो यातूनही आम्हाला पुढचे निर्णय घेता येईल.