एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा


ठाणे – गुरुवारी आपल्या पदाचा ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरिक्षक आणि तब्बल ११३ गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नावावर नोंद असलेले प्रदीप शर्मा यांनी राजीनामा दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. शर्मा यांनी व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचे कारण दिल्याची माहितीही सुत्रांनी दिली. पण प्रदीप शर्मा आगामी निवडणुकांमध्ये निवडणूक लढण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आता ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल.

नियमाप्रमाणे प्रदीप शर्मा यांनी राजीनामा दिला असून पोलीस महासंचालकांना यावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे. प्रदीप शर्मा आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये निवडणूक लढण्याची चिन्हे आहेत. त्यांनी त्यामुळे पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज 4 जुलै रोजी केलेला आहे.

आतापर्यंत प्रदीप शर्मा यांनी केलेले अनेक एन्काउंटर्स आणि मोठ्या कारवाया या राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचलेल्या होत्या. त्यांची एक जिगरबाज पोलीस अधिकारी, अशी ओळख होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ठाणे पोलीस आयुक्तालयात अनेक मोठे धाडसी निर्णय घेतले होते. कुख्यात गुन्हेगार दाउद इब्राहिमचा चुलता इकबाल कासकर याला त्यांनी काही महिन्यांपूर्वी घरात घुसून अटक केली होती. तसेच दाऊद इब्राहिमचा पुतण्या आणि इकबाल कासकरचा मुलगा रिजवान कासकर यालाही हवाला रॅकेट संदर्भात प्रदीप शर्मा यांनीच मुंबई विमानतळावरुन अटक केली आहे.

Leave a Comment