या आयएएस अधिकाऱ्याने एकेकाळी पुसली आहे हॉटेलची फरशीही


आज आम्ही माझा पेपरच्या वाचकांसाठी एका आयएएस अधिकाऱ्याची कहाणी घेऊन आलो आहोत. ज्याच्या घरी घरी पैशाची एवढी चणचण होती की, त्यांच्या नशीबी दोन वेळचे जेवण भेटले की नाही याची बोंब होती. वडील रिक्षाचालक असून ते दिवसभरात जेमतेम शे-दोनशे रुपये कमवायचे आणि रात्री तेही दारूवर उडवायचे. मग घरी येऊन शिवीगाळ मारहाण करायचे. तो अशा परिस्थितीतून अभ्यास करत मोठा झाला. त्याने शिक्षण पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी हॉटेलामध्ये देखील काम केले आणि आपल्या मेहनतीच्या जीवावर युपीएससीची परिक्षा दिली. तो देशात 371 वी रँक मिळवत आयएएस झाला आणि आता पश्चिम बंगालमध्ये विशेष पदावर कार्यरत आहे. आम्ही तुम्हाला ज्या व्यक्ती बद्दल सांगत आहोत ती मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील एका छोट्या गावाची रहिवाशी आहे. तो वयाच्या 21 व्या वर्षी आयएएस झाला. देशातील सर्वात तरुण सनदी अधिकारी म्हणून गाजलेल्या अन्सार अहम्मद शेख यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

मराठवाड्यातील शेलगाव नावाच्या एका लहान गावात अन्सार वाढला. बदनापूर तालुक्यातील या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात हुशार असला, तरी शिक्षण सोडून त्याने कामधंद्याला लागावे, अशी घरच्यांची इच्छा होती. कारण घरात पैशाची अडचण होती. वडील रिक्षा चालवायचे, पण त्यातून घराला पुरेसे उत्पन्न मिळत नव्हते. आई मोलमजुरी करायची, तरी देखील दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नसे. मग नातेवाईकांच्या सल्ल्याने वडिलांनी सांगितले शाळा सोड आणि कामाला लाग. वडील ते सांगायला शाळेतही गेले. पण त्यांना शिक्षकांनी समजावले. अन्सार हुशार आहे, त्याचे शिक्षण थांबवू नका, असे सांगितल्याचे अन्सार शेख यांनी एका मुलाखतीत सांगितले.

त्यासाठी वडील कसेबसे तयार झाले आणि दहावीपर्यंतचे अन्सारचे शिक्षण तरी पार पडले. चांगले मार्क मिळाल्यामुळे बारावीपर्यंतचं शिक्षण घ्यायची परवानगी मिळाली. पुढच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेतच प्रवेश घेतला. अन्सारने मेहनतीने अभ्यास केला आणि 91 टक्क्यांच्या वर मार्क मिळवले. एवढे मार्क आसपासच्या कुणालाच कधी मिळाले नव्हते. त्यानंतर घरच्यांनी शिक्षण सोड म्हणून कधी सांगितले नाही.

घरच्यांची शिक्षण पूर्ण करायला ना नव्हती, तरी त्यांच्याकडे पैसेही नव्हते, मग पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मिळेल ते काम अन्सारने स्वीकारले. हॉटेलमध्ये काही काळ रोजंदारीवर कामही केले. तिथे कधी पाणी द्यायचे काम असे, तर कधी फरशी पुसायचे. पण तोपर्यंत अन्सारने आपले ध्येय निश्चित केले होते.

दरम्यान ऑफिसर व्हायचा ध्यास अन्सार शेखने घेतला होता. त्याला बारावीत असतानाच एक ब्लॉक ऑफिसर पदाला असलेला सरकारी अधिकारी भेटला. त्याने त्याच्यासारखे मोठे व्हायचे, हा ध्यास घेतला. त्यासाठी काय करावे लागेल, कुठली परीक्षा द्यावी लागेल, याची माहिती मिळवली आणि युपीएससी द्यायचा त्याचा निर्णय पक्का झाला. पुढच्या तयारीसाठी अन्सार पुण्यात आला आणि दररोज मन लावून अभ्यास करू लागला. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असे रुटीन सुरू होते.

अन्सार शेख सांगतात, युपीएससीच्या परीक्षेचा निकाल होता, माझ्या खिशात त्याही दिवशी बाहेर खाण्याएवढे पैसे नव्हते. रिझल्ट मित्रांनीच पाहिला आणि माझे नाव यादीत दिसल्यावर पार्टी मागितली. खुशीने मिठाई वाटण्याएवढे पैसे नव्हते तेव्हा, मग मित्रानेच मदत केली. मेहनतीचे फळ मिळाले याचाच जास्त आनंद होता. आता त्या मेहनतीच्या जोरावरच सगळे हाती आले आहे. अन्सार शेख यांनी 2015 मध्ये युपीएससीची परीक्षा दिली. 2016 च्या बॅचचे ते आयएएस ऑफिसर आहेत आणि पश्चिम बंगाल कॅडरमध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे.