आता ‘या’ दिवशी रिलीज होणार प्रभासचा ‘साहो’


मागच्या बऱ्याच काळापासून दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘साहो’ चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटातील सय्या सायको हे गाणे काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले. प्रेक्षकांचा ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. येत्या 15 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार होता. पण या चित्रपटाची रिलीज डेट आता बदलण्यात आली आहे. या चित्रपटासोबतच बॉलिवूडमधील आणखी दोन चित्रपट रिलीज होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर चुरस पाहायला मिळेल असे काही दिवसांपासून म्हटले जात होते पण आता असे होणार नाही.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार बहुप्रतिक्षीत ‘साहो’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट याआधी येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्य दिनी रिलीज होणार होता. पण या तारखेत आता बदल करण्यात आले असून हा चित्रपट आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रिलीज होणार आहे. 2 तेलुगू चित्रपटसुद्धा 15 ऑगस्टला रिलीज होत आहेत. तेलुगू अभिनेता शर्वानंद स्टारर ‘रणरंगम’ आणि अदिवी शेषचा ‘एवरू’ हे चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होत असल्याने साहोच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला असून 30 ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

याशिवाय बॉलिवूडमध्ये ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ हे दोन चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील टक्कर पाहता साहोच्या निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात असल्यामुळे आता प्रभासच्या चाहत्यांना आणखी काही काळ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.