आईवडील माहीला सांगत आहेत तलवार म्यान करायला


रांची : विश्वचषक स्पर्धा नुकतीच संपन्न झाली असून त्यानंतर आता टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सध्याचा विकेटकीपर फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर जोरदार चर्चा सुरु आहेत. अनेकजण धोनीने निवृत्त व्हावे असे म्हणत आहेत, तर धोनीने अजून खेळत राहावे, असाही एक मतप्रवाह आहे.

एकीकडे धोनीच्या निवृत्तीवरुन हा वाद सुरु असताना, धोनीचे बालपणीचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी केलेला दावा विचार करायला लावणारा आहे. त्याने निवृत्ती घ्यावी असे धोनीच्या आई-वडिलांनाही वाटत असल्याचे केशव बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

रविवारी धोनीच्या रांचीतील जुन्या घरी त्याच्या आई-वडिलांना केशव बॅनर्जी हे भेटले. त्यावेळी आता धोनीने निवृत्ती घ्यावी अशी इच्छा त्याच्या आई-वडिलांनी केशव बॅनर्जींकडे व्यक्त केली. केशव बॅनर्जी म्हणाले, मला धोनीच्या कुटुंबीयांनी सांगितले की धोनीने निवृत्त घ्यावी अशी संपूर्ण मीडियाची इच्छा आहे. जेव्हा याचा विचार आम्ही करतो, तेव्हा आम्हालाही ते योग्य वाटते. आता ही मोठी संपत्ती आम्ही सांभाळू शकत नाही.

केशव बॅनर्जी यांनी यावेळी धोनीला पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 विश्वचषकात खेळू देण्याची विनंती त्याच्या आई-वडिलांकडे केली. टी 20 विश्वचषक 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात होणार आहे. 38 वर्षीय धोनीने नुकत्याच झालेल्या वन डे विश्वचषकातील 8 सामन्यात 273 धावा केल्या. धोनीच्या संथ खेळीवर टीका झाली. विश्वचषकाचा दावेदार असलेल्या भारतीय संघाला सेमीफायनलमध्येच गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे भारतीय संघात आता फेरबदलाची चर्चा सुरु आहे. त्यामध्ये पहिलं नाव धोनीचं घेतलं जात आहे.

Leave a Comment