अविवाहित मुलीला मोबाईल दिल्यास वडिलांना भरावा लागेल एवढा दंड


अहमदाबाद – अविवाहित मुलींच्या मोबाईल वापरण्यावर गुजरातच्या ठाकोर समुदायाच्या जात पंचायतीने बंदी लावली आहे. समुदायाच्या अविवाहित मुलींना यापुढे मोबाईल फोन वापरता येणार नाही. मोबाईल बाळगल्याप्रकरणी पकडले गेल्यास त्याचा दंड वडिलांना भरावा लागणार आहे. जात पंचायतीच्या फतव्यानुसार, संबंधित मुलीच्या वडिलांकडून दंडाची रक्कम म्हणून तब्बल 1.5 लाख रुपये वसूल केले जाणार आहेत. हे आदेश बनासकांठा येथील दंतीवाडा गावात जारी करण्यात आले आहेत.

आपल्या समुदायात राहणाऱ्यांसाठी नव-नवीन नियम या पंचायतीचे लोक बनवतात. लोकांनी कसे वागायचे यावर सुद्धा यात बंधने आहेत. नवीन आदेशानुसार, यापुढे अविवाहित मुलींना मोबाईल वापरता येणार नाही. त्या मुलीच्या पालकांची ही जबाबदारी राहील. मोबाईल बाळगत असल्याचे आढल्यास याला समाजाच्या नियमांचे उल्लंघन मानले जाईल आणि वडिलांवर दीड लाखांचा दंड लावला जाईल. त्याचबरोबर गावातील तरुण आणि तरुणींनी कुणाशी विवाह करावा यावर सुद्धा बंधने लादण्यात आली. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन कुठल्याही मुलाने किंवा मुलीने लग्न केल्यास त्याला देखील गुन्हा मानले जाईल. यापूर्वी देखील या पंचायतीने काही आदेश सोडले आहेत. त्यामध्ये लग्नात आगाऊ खर्च रोखण्यासाठी डीजे आणि आतषबाजीवर बंदीचा समावेश आहे. दरम्यान, स्थानिकांनी केलेल्या दाव्यानुसार मोबाईलवर बंदीचा नियम अजुनही लागू करण्यात आलेला नाही. त्यावर किती दंड वसूल करायचा यावर देखील विचार सुरू आहे.

Leave a Comment