कोथिंबीरीचे भाव गगनाला भिडले; एक जुडी तब्बल 331 रुपयांना!


नाशिक – शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातच कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडले असून तब्बल ३३१ रुपयांचा भाव कळवण तालुक्यातील औत्यापाणी येथील कोथिंबीरीच्या एका जुडीला मिळाला आहे.

कोथिंबीरीच्या दरात गेल्या आठवड्यापासून मोठी वाढ होत आहे. प्रति शेकडा ३३ हजार १०० रुपये एवढा विक्रमी दर नाशिक बाजार समितीत कळवण तालुक्यातील औत्यापाणी गावातील काशिनाथ कामडी यांच्या कोथिंबिरीला मिळाला. त्यांनी आणलेल्या ३५४ जुड्यांना प्रति जुडी ३३१ रुपये दर मिळाला आहे. कोथिंबिरीचा दर गेल्या आठवड्यात २२ हजार रुपये प्रति शेकडा होता. त्यामुळे चांगल्या प्रतिची कोथिंबीर ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्यांना आता सोन्याचा भाव मिळणार आहे.

७ जुलै रोजी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पेठ, सुरगाण आणि दिंडोरी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या तुलनेत कळवण तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील भाजीपाला सुस्थितीत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये भाजीपाला, फळभाज्या यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी होत नसल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे.

प्रथमच नाशिक बाजार समितीमध्ये आडत बंद झाल्यानंतर कोथिंबिरीला प्रति जुडी ३३१ रुपये दर मिळाला. यापूर्वी जेव्हा आडत सुरु होती तेव्हा २७० रुपये दर मिळाला असल्याचे शिवांजली कंपनीचे संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले.

Leave a Comment