अंबिकापुरमध्ये बनले देशातील पहिले गार्बेज कॅफे


छत्तिसगढच्या अंबिकापुर मध्ये देशातील पहिले गार्बेज कॅफे सुरु झाले आहे. शहर प्रशासनाने यासाठी पुढाकार घेतला असून या योजनेअंतर्गत गरीब आणि बेघर लोकांना प्लास्टिक कचरा आणून दिला कि जेवण दिले जाणार आहे. दररोज एक किलो प्लास्टिक पिशव्या गोळा करून आणल्यास जेवण तर अर्धा किलो आणल्यास भरपेट नास्ता दिला जाणार आहे. त्यासाठी नगरपालिकेने अर्थसंकल्पात साडेपाच लाख रुपयांची तरतूद केली असून हा पैसा कमी पडला तर लोकप्रतीनिधीकडून मदत घेतली जाणार आहे.

अंबिकापुरचे महापौर डॉ. अजय तिर्की म्हणाले ही योजना स्वच्छता अभियानाचा एक भाग आहे. सध्या आमचे गाव देशातील स्वच्छ गावात दोन नंबरवर असून गार्बेज कॅफे सुरु करणारे देशातील पहिलेच गाव आहे. गावात प्लास्टिक बॅगवर बंदी आहे. गार्बेज कॅफे सुरु केल्याने ही बंदी अधिक कठोरपणाने राबविता येणार आहे. जमा केलेल्या प्लास्टिकपासून छोटे दाणे बनविले जातात आणि ते डांबरी रोड मध्ये वापरले जातात.

असा एक रस्ता ८ लाख किलो प्लास्टिक वेस्टपासून बनविला गेला असून तो टिकाऊ आहे. कारण त्यातून आत पाणी जाऊ शकत नाही असेही तिर्की यांनी सांगितले.

Leave a Comment