आयसीसीच्या संघात दोन भारतीय खेळाडूंची वर्णी


लंडन – इंग्लंडने रोमहर्षक ठरलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या निकषानुसार बाजी मारली. प्रथमच क्रिकेट जन्मदाता इंग्लंडचा संघ विश्वविजेता ठरला. आयसीसीने स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर सोमवारी आपला संघ जाहीर केला. या संघात कर्णधार कोहली, महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. पण या संघात भारतीय दोन खेळाडूंची वर्णी लागली आहे.

दरम्यान,पाकिस्तानसह पाच देशाच्या संघातील एकाही खेळाडूचा आयसीसीच्या या संघात समावेश करण्यात आलेला नाही. आयसीसीच्या संघात भारताकडून स्पर्धेत पाच शतके ठोकण्याचा विक्रम करणारा रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहला स्थान मिळाले आहे. विश्वचषक स्पर्धेत विराट इतक्याच ४४३ धावा करणारा इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले आहे. तर विराटला वगळण्यात आले आहे. स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार मिळवणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला आयसीसीच्या संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. तर रोहित शर्मा आणि जेसन रॉयला सलामीसाठी निवडण्यात आले. तिसऱ्या जागेसाठी विल्यमसन, त्यानंतर जो रुट, अष्टपैलू शाकीब अल हसन आणि बेन स्टोक्सची निवड करण्यात आली आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीला यष्टीरक्षणासाठी निवडण्यात आले आहे.

आयसीसीने गोलंदाजासाठी मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, लॉकी फर्ग्युसन आणि जसप्रीत बुमराह यांना निवडले आले आहे. मिचेल स्टार्कने स्पर्धेत सर्वाधीक २७ गडी बाद केले आहेत. त्यामुळे गोलंदाजीची कमान त्याकडे सोपवण्यात आली आहे.


आयसीसी संघ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर निवडण्यात आला. संघ निवड कमिटीमध्ये माजी समालोचक इयन बिशप, इयन स्मिथ, इसा गुहा, क्रिकेटवर लिहिणारे लॉरेन्स बूथ याचा सहभाग होता. आयसीसीच्या संघात इंग्लंडचे चार, भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी दोन तर बांगलादेशच्या एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या संघातील एकाही खेळाडूचा समावेश या संघात करण्यात आलेला नाही.

Leave a Comment