मुंबईच्या महापौरांनाही नो पार्किंगबद्दल भरावा लागणार दंड


मुंबई – विलेपार्ले येथे नो पार्किंगमध्ये मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गाडी पार्क केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडून पालिका दंड वसूल करणार का? असा सवालही केला जात होता. परंतु महापौरांनाच आता दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच नो पार्किंग धोरण मुंबई महापालिका आयुक्तांनी जाहीर केले आहे. त्यानुसार नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणाऱ्यांकडून मोठा दंड आकारण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी जाहीर केलेल्या नो पार्किंग धोरणानंतर अनधिकृत पार्किंगविरोधात पालिकेने मोठी कारवाई सुरू केली होती. त्यानंतर पालिकेने केवळ आठवडाभरातच 23 लाखांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, हा नियम वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी करण्यात आल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचीच गाडी त्यानंतर नो पार्किंगमध्ये उभी असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. महापौरांवर त्यानंतर कारवाई होणार का? असा सवाल सर्व स्तरातून केला जात होता. पालिकेने अखेर त्यांच्यावर कारवाई करत त्यांना ई-चलन पाठवले असल्याचे माहिती समोर आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर होणारी टीका पाहता महापौरांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. उतरण्यासाठी आपण गाडी थांबवली होती, पार्क करण्यात आली नव्हती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केले असे म्हणता येत नाही. पण पावती आलीच तर दंड भरु, असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांना ई-चलन पाठवण्यात आहे.

Leave a Comment