गुगलचे नवे शूलेस अॅप देणार फेसबुकला टक्कर


लोकांच्या जीवनात सध्या सोशल मिडिया हा अविभाज्य घटक बनला असल्यामुळे लोकांचे जीवनही पूर्णतः बदलून गेले आहे. यात आता गुगलने पुन्हा शिरकाव करण्यासाठी आपले नवीन सोशल मीडिया अॅप शूलेस (Shoelace) लॉन्च केले आहे. वापरकर्ते या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे एकमेकांना ऑफलाइन कनेक्ट होऊ शकणार आहेत. गुगलच्या इन-हाउस टीम एरिया 120 युनिटद्वारे हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिझाइन केला आहे. लोकांना वास्तविक जीवनात गुंतवून ठेवणे हे या सोशल मीडिया अॅपचे मुख्य लक्ष्य आहे.

लोकांचे स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडीच्या गोष्टी, आवडीच्या कृती या प्लॅटफॉर्मवर याद्वारे तुम्ही लोकांशी जोडले जाणार आहात. तसेच यामध्ये तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी कनेक्ट होण्याची, मैत्री करण्याची खास सोय असणार आहे. तुम्हाला प्रत्येकवेळी कम्युनिटी जॉईन करताना व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असणार आहे. गुगल शूलेस सध्या फक्त इन्व्हाईट ओन्ली बेसिसवर, अमेरिकेत उपलब्ध आहे. हे सोशल मीडिया अॅप अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्हीला सपोर्ट करेल. अमेरिकेमधील टेस्टिंग यशस्वी झाल्यावर इतर ठिकाणी हे रोल आऊट केले जाईल.

वापरकर्त्यांकडे या सोशल मीडिया अॅपमध्ये सामील होण्यासाठी गुगलचे खाते असणे आवश्यक आहे. जे लोक नव्या ठिकाणी अथवा नव्या शहरात आहेत किंवा ज्यांना आजूबाजूंच्या परिसराची काही माहिती नाही अशा लोकांसाठी हे अॅप खूपच फायद्याचे ठरणार आहे. याआधी गुगलने त्यांचे गुगल प्लस हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म बंद केल्यानंतर आता हे नवीन प्लॅटफॉर्म फेसबुकला तगडी टक्कर देईल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे.

Leave a Comment