रेल्वे प्रवास करताय, मग ही माहिती हवीच


रेल्वेने अनेकदा प्रवास करायची वेळ आपल्यावर येते. ऐनवेळी तिकीट हरविणे, गाडी सुटणे, तिकीट तपासनीस ऐवजी दुसऱ्या कुणी तिकीट तपासणे अश्या अनेक अडचणी येऊ शकतात. आपण रेल्वेने प्रवास करतो पण या प्रवासाबद्दल रेल्वे प्रशासनाने तयार केलेले नियम आपल्याला माहिती असतातच असे नाही. रेल्वे प्रवास करताना काही नियम माहिती असणे आवश्यक आहे.

सर्वात प्रथम लक्षात ठेवायचे कि आपले तिकीट गाडीबाहेर किंवा प्रत्यक्ष गाडीत चेक करण्याचा अधिकार फक्त तिकीट तपासनीस यांना आहे. तसाच तो सचल दस्त्याला आहे. रेल्वे पोलीस, जीआरपी जवान तुम्हाला तिकीट चेक करण्यासाठी मागू शकत नाहीत. मात्र सर्च ऑपरेशन सुरु असेल तर टीसी या पोलीस जवानांची मदत घेऊ शकतात.


अनेकदा असे होते कि आपले तिकीट कन्फर्म असते पण ज्या स्टेशनपासून ते तिकीट आहे त्याऐवजी आपण दुसऱ्या स्टेशनवरून गाडीत चढतो. अश्या वेळी अनेकदा टीसी आपली सीट दुसऱ्या प्रवाशाला देतो. नियमानुसार तिकीट कन्फर्म असलेला प्रवासी पुढची दोन स्टेशन किंवा १ तास वाट पाहूनही गाडीत चढला नसेल तरच ती सीट टीसी दुसऱ्या प्रवाशांना देऊ शकतो.

आपला मधला बर्थ कन्फर्म असेल तर रात्री १० नंतर आणि सकाळी ६ पर्यंतच तो झोपण्यासाठी वापरता येतो. रात्री १० पूर्वी हा बर्थ आपण आडवा टाकू शकत नाही. तोपर्यंत आपल्याला लोअर सीटवर बसून प्रवास करण्याच अधिकार आहे.

आजकाल तिकट मोबाईलवर असते पण काही कारणाने तिकीट हरविले असेल तर गाडी सुटण्याच्या अगोदर २४ तास बोर्डिंग स्टेशनवरील प्रमुख रिझर्वेशन सुपरवायझर कडून डुप्लिकेट तिकीट मिळू शकते. टीसी रात्री १० नंतर तुम्हाला डीस्टर्ब करू शकत नाही. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच तिकिटे तपासणी साठी मागू शकतात.

Leave a Comment