सुपर टायब्रेकरमध्ये जोकोव्हिच झाला टेनिस कोर्टचा ‘बादशाह’


लंडन – क्रिकेट विश्वचषक आणि विम्बल्डनचे अंतिम सामने ‘न भूतो न भविष्यति’ अशा निर्णयांमुळे चांगलाच लक्षात राहिला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला. तर, विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात अव्वल मानांकित जोकोव्हिचने दुसऱ्या मानांकित फेडररला ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) असे पराभूत केले.


सर्बियाच्या जोकोव्हिचला या चित्तथरारक लढतीमध्ये सुपर टायब्रेकरमध्ये दाखवलेल्या शांत खेळामुळे विजय साध्य करता आला. तब्बल चार तास आणि ५५ मिनिटे ही लढत रंगली होती. पहिला सेट जिंकून जोकोव्हिचने दमदार सुरुवात केली. त्यानंतर मात्र, फेडररने दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचचे आव्हान परतून लावले. या दोन्ही खेळांडूमध्ये तिसऱ्या सेटमध्ये झुंज पाहायला मिळाली. टायब्रेकरमध्ये हा सेट गेला होता. परंतु जोकोव्हिचने येथेही ७-४ अशा फरकाने सरशी साधली. फेडररने चौथ्या सेटमध्ये बॅकबँडच्या फटक्यांचा अफलातून मारा करत परत सामना बरोबरीत आणून ठेवला.

दोघांनी पाचव्या आणि विजेता ठरवणाऱ्या या सेटमध्ये कडवा प्रतिकार केला. कधी जोकोव्हिच तर कधी फेडरर अशा अवस्थेत असणाऱ्या या सेटने चाहत्यांची मने जिंकली. सुरुवातीला आघाडी घेणाऱ्या जोकोव्हिचवर फेडररने परत एकदा समान सरशी साधली. १२-१२ अशा अवस्थेत सामना पोहचल्यानंतर सुपर टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला आणि त्यामध्ये जोकोव्हिचने बाजी मारत पाचवे विम्बल्डन विजेतेपद पटकावले.

Leave a Comment