ही आहेत लक्ष्मण झुल्याची वैशिष्टे


पवित्र भूमी हृषीकेश येथील प्रसिद्ध लक्ष्मण झुला हा पूल आता जुना झाल्याने बंद करण्यात आला आहे. ९० वर्षे जुना असलेल्या या पुलाबद्दल भाविकांच्या मनात श्रद्धा होती त्याचे कारण त्यामागे असलेला इतिहास. असे मानले जाते कि श्रीरामाचा भाऊ लक्ष्मण याने पवित्र गंगा नदीवर हा पूल त्रेतायुगात उभारला तेव्हा तागाच्या दोऱ्या वापरून तो उभारला गेला होता. हा झुलता पूल आहे म्हणजे त्याला मध्ये कोठेही आधार नाही. सर्वप्रथम श्रीरामाची पाऊले या पुलाला लागली आणि तो पवित्र स्थान बनला. तेव्हापासून हृषीकेश दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक या पुलावरून एकदा तरी जातो. या पुलावरून चालणाऱ्याना पुण्यप्राप्ती होते अशी भावना आहे.

या पुलावरून राम सीता आणि लक्ष्मणाने गंगा पार केली होती. हा पूल पार करताना दोन वाटा आहेत. डावीकडची वाट पायी पार करता येते तर उजवीकडची वाट बद्री व स्वर्गाश्रम वाट आहे. या पुलाच्या पश्चिम किनारयावर लक्ष्मण मंदिर आहे. स्कंद पुराणात या पुलाखाली इंद्रकुंड आहे असे उल्लेख आहेत. मात्र हे इंद्रकुंड सध्या दिसत नाही.


हा पूल १८८९ मध्ये कोलकाता येथील सेठ सुरजमल झुहानुवल यांनी त्यांचे गुरु स्वामी विशुद्धानंद यांच्या प्रेरणेवरून पुन्हा बांधला तेव्हा तागाच्या ऐवजी लोखंडी तारा वापरल्या गेल्या. त्यावेळी पुलावर चालण्यासाठी पट्ट्या नव्हत्या तर एकाबाजूने टोपलीत बसून दुसरीकडे जाता यात असे. त्यानंतर पुल पायी चालण्यायोग्य बनविला गेला. हा लोखंडी पूल १९२४ साली गंगेला आलेल्या प्रचंड महापुरात वाहून गेला होता. १९३० साली ब्रिटीश शासन काळात तो पुन्हा बांधला गेला. हा पूल ४५० फुट लांबीचा आहे आणि तो सस्पेन्शन ब्रिज आहे.

Leave a Comment