अपंगांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी महापौर बनला अपंग


कोणत्याची शहराचा महापौर हा प्रथम नागरिक असतो आणि शहरातील नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेणे, त्यांना सुविधा योग्य प्रकारे मिळत आहेत का याची खात्री करून घेणे त्याचे महत्वाचे काम असते. मेक्सिकोच्या चीहुआहुआच्या कुयाटेमोक शहराच्या महापौरांनी त्यांची ही जबाबदारी अनोख्या रीतीने पार पाडली. महापौर कार्लोस टेना यांच्याकडे अनेक दिवस अपंग लोकांना सरकारी अधिकारी चांगली वागणूक देत नाहीत अश्या तक्रारी येत होत्या. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी हे महापौर चौकशी समिती नेमून गप्प राहिले नाहीत. त्यांनी दोन महिने स्वतः अपंग माणसाचे सोंग घेऊन अनेक सरकारी विभागात फेरफटका मारला. त्यावेळी त्यांना जी वागणूक मिळाली ते पाहिल्यावर सरकारी कार्यालयातून अपंगाना खरोखरच वाइट वागणूक दिली जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग मात्र त्यांनी स्वतःचे खरे रूप उघड करून या उद्धट अधिकाऱ्यांना चांगलेच झापले आणि पुन्हा असे वर्तन झाले तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा दम भरला.


आपण अपंग आहोत असे भासावे म्हणून कार्लोस कधी काळा चष्मा, कधी कानावर बँडेज, कधी स्वेटर, कधी हॅट घालून रूप बदलत असत. त्यांनी काही ठिकाणी भिक सुद्धा मागितली. त्यावेळी समाज कार्याशी संबंधित अनेक सरकारी विभागात त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली तर एक दोन अधिकारी इमानदारीने काम करत असल्याचा अनुभव त्यांना आला. या सोशल सर्व्हिस ऑफिसनंतर अपंगाच्या वेशात कार्लोस त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात गेले तेव्हा तेथील लोकांनी महापौर आलेले नाहीत, आज भेटणार नाहीत, तुमचे काम होणार नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी महापौर अपंगांसाठी असलेल्या खुर्चीतून कार्यालयात आले होते. उडवाउडवीची उत्तरे ऐकताच ते खुर्चीतून उठले आणि खरे स्वरूप दाखविले तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.

कार्लोस म्हणाले, गेली अनेक वर्षे मी समाजसेवा करतो आहे. अपंग लोकांना रोज काय काय सहन करावे लागते याच्या तक्रारी मी ऐकत होतो पण लोकांच्या तक्रारीवर विश्वास ठेऊ कि माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांवर भरोसा करू असा माझ्यापुढे प्रश्न होता. पण माझेच सहकारी अपंग लोकांना चांगली वागणूक देत नाहीत अशी कल्पना मी कधीच केली नव्हती. त्यामुळे मी स्वतः अपंगांचा वेश घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी हा मार्ग निवडला.

Leave a Comment