चीनी भिकारी झाले डिजिटल


चीन देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली असामान्य प्रगती जगासाठी आदर्श नमुना ठरली आहे. चीनमध्ये आता भिकारी सुद्धा डिजिटल झाले असून भिक मागण्यासाठी क्यू आर कोड आणि ई वॉलेटचा वापर करत आहेत. या पद्धतीने आठवड्याला हे भिकारी ४५ हजार रुपयांपर्यत कमाई करत आहेत. विशेष म्हणजे अनेक ई वॉलेट कंपन्यांनी या भिकाऱ्यांना क्यू आर कोड उपलब्ध करून दिला आहे. अर्थात त्यामागचा अंतर्गत हेतू व्यवसाय वाढ हाच आहे. कारण हा कोड भिक देणाऱ्याने स्कॅन केला, की त्याचा सर्व डेटा कंपन्यांकडे येतो आणि हा डेटा विकून या कंपन्या चांगली कमाई करत आहेत.

चीनमधील जायंट ई कॉमर्स कंपनी अलीबाबाच्या अली पे, टेन्सेंटच्या व्ही चॅट या बड्या कंपन्यांसह अनेक ई वॉलेट कंपन्या यात सामील आहेत. चीनमधील लोकप्रिय पर्यटन स्थळे, सबवे स्टेशनचा आसपास असे डिजिटल भिकारी दिसतात. यामुळे त्यांना भिक मिळतेच शिवाय भिक देणारे सुटे पैसे नाहीत हे कारण सांगू शकत नाहीत. कुणी सुटे पैसे नाहीत असे सांगितले तर हे भिकारी त्यांना क्यू आर कोड प्रिंटआउट दाखवून त्यांच्याकडे हा कोड नुसता स्कॅन करा अशी याचना करतात.

चीनमधील स्थानिक मिडियाच्या बातमीनुसार या व्यवस्थेशी बाजाराचा संबंध आहे. त्यासाठी अनेक स्पॉन्सर्ड कोड आले आहेत. भिकारी भिक मागताना काही पैसे द्या किंवा हा स्पॉन्सर्ड कोड स्कॅन करा असे सांगतात. यामुळे भिकाऱ्यांना काही रक्कम मिळतेच. चीनमध्ये भिकाऱ्यांना त्यांचे खाते चालविण्यासाठी मोबाईल फोनची गरज नाही कारण क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळणारी भिक थेट त्यांच्या डिजिटल वॉलेट मध्ये जाते आणि क्यू आर शीटच्या सहाय्याने ते किराणा किंवा अन्य दुकानातून सामान खरेदी करू शकतात. त्यासाठी बँक खाते असण्याची गरज नाही.

Leave a Comment