हा माजी खेळाडू म्हणतो रोहितला बनवा संघाचा कर्णधार !


नवी दिल्ली – २०१९ विश्वचषक स्पर्धेतील विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. आता या पराभवाचे पडसाद उमटायला लागलेले आहेत. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी पराभवाच्या कारणांबद्दल बीसीसीआयची क्रिकेट प्रशासकीय समिती चर्चा करणार आहे. पण नेतृत्वबदलाचा मुद्दा भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर फलंदाज वासिम जाफरने उपस्थित केला आहे.


वासिम जाफरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन, रोहित शर्माकडे मर्यादीत षटकांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व देण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्न विचारला आहे. रोहितला २०२३ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना पाहणे मला आवडेल, असे म्हणत नवीन चर्चेला वासिम जाफरने तोंड फोडले आहे.

विश्वचषकानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारतीय संघ रवाना होणार आहे. निवड समिती विराट कोहली आणि काही प्रमुख खेळाडूंना या दौऱ्यात विश्रांती देण्याच्या तयारीत आहे. या दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment