पणजी: सध्या गोव्यामध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्यावरून वेगवेगळ्या स्तरातून टीका होत आहेत. पक्षातील काही लोकांचा देखील यामध्ये समावेश आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाच्या नावाचीही यात आता भर पडली आहे. उत्पल यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, हे जे घडत आहे ते माझ्या वडिलांच्या विचारांच्या विरोधात घडत आहे. माझे वडील असते तर त्यांनी असा मार्ग निवडला नसता, असे उत्पल पर्रिकर यांनी म्हटले आहे.
भाजपवर मनोहर पर्रिकरांच्या मुलाची टीका
उत्पल यांनी म्हटले आहे की, माझ्या वडिलांच्या 17 मार्चला निधनानंतर त्यांनी तयार केलेला मार्गाचाही अंत झाला. गोवावासियांना काल याची प्रचिती देखील आली. भाजपसाठी 17 मार्च रोजीच विश्वास आणि वचनबद्धता या शब्दांचा अर्थ उरलेला नाही. उत्पल यांनी म्हटले आहे की, गोवा भाजप वडिलांच्या निधनानंतर आता वेगळ्या दिशेने चालली आहे. ज्या मार्गाने भाजप चालली आहे तो निश्चितच योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता सिद्धार्थ कुंकळयेकर यांना तिकीट दिले होते. काँग्रेस उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी त्यांचा पराभव केला होता. आता भाजपमध्ये मोन्सेरात यांनी देखील प्रवेश केल्याने अनेक भाजपवासीयांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काल दिल्लीत जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्ज भरुन काँग्रेसपासून फारकत घेतलेल्या दहा आमदारांनी रितसर पक्षप्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली. बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून आज किंवा उद्या शपथविधी होणार आहे.