ऋषभ पंतला डिवचणाऱ्या पीटरसनला युवराज सिंहने झापले


युवा फलंदाज ऋषभ पंतची भारतीय संघाच्या २०११ विश्वचषक विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या युवराज सिंहने पाठराखण केली आहे. अनेक दिग्गजांनी पंतवर भारतीय संघाच्या उपांत्य सामन्यातील पराभवानंतर टीका केली होती. पंतने या सामन्यात चौथ्या क्रमांकावर येऊन खेळपट्टीवर जमही बसवला होता; पण आपली विकेट खराब फटका मारून दिल्यानंतर पंतच्या फलंदाजीवर पीटरसनने ट्विट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंतला चौथ्या क्रमांकावर का खेळवले यावरही पीटरसनने प्रश्न उपस्थित केले होते. पंतच्या चुकीच्या फटक्यावर पीटरसनशिवाय अनेक दिग्गज खेळाडूंनी ताशेरे ओढले होते. मात्र पंतची पाठराखण युवराजने केली आहे. पंत नवीन आहे आणि अनुभवातून तो सगळे काही शिकेल असे युवराजने म्हटले आहे.

युवी ऋषभ पंतला पाठींबा देताना म्हणाला की, फक्त आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचा अनुभव ऋषभ पंतकडे आहे. यात त्याची काहीच चूक नाही. अनुभवातून तो शिकेल आणि मोठा खेळाडू होईल. असे म्हणत युवीने पीटरसनला झापले आहे. पीटरसनलाही राग येणार नाही याची पुरेपूर काळजी युवराजने घेतली आहे. ट्विटच्या अखेरीस युवराज म्हणतो, प्रत्येकाला आपले मत मांडायचा अधिकार आहे.


पीटरसनने पंत बाद झाल्यानंतर ट्विट करत टीकास्त्र सोडले होते. तुम्ही अशा चुका करताना पंतला कितीवेळा पाहिले. त्याला अशा चुकांमुळेच भारतीय संघात स्थान मिळत नव्हते. हे अतिशय दयनीय आहे. असे ट्विट पीटरसनने केले होते.

Leave a Comment