भाजपसाठी राजकीय मैदानावर फटकेबाजी करणार धोनी!


नवी दिल्ली – भारताचा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये अवघ्या १८ धावांनी पराभव झाल्याने विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न अपूर्ण राहिले. हा सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या अफवांनी जोर धरला. पण अद्याप याबद्दल धोनीने कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण बिहारमधील भाजपच्या एका बड्या नेत्याने धोनी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर राजकारणात उतरुन भाजपसाठी राजकीय मैदानावर फटकेबाजी करणार असल्याचे संकेत दिले आहे. धोनीने भाजपचे सदस्य व्हावे यासाठी बिहार विधानपरिषदेचे सदस्य आणि माजी केंद्रीय मंत्री संजय पासवान यांनी त्याच्याशी अनेकदा बोलणे झाल्याचे स्पष्ट केले आहे. जर असे झाल्यास, भाजपला त्याचा मोठा फायदा होईल असे मत पासवान यांनी व्यक्त केले आहे.

भाजपने काही महिन्यांपूर्वी हाती घेतलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत धोनीची पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासहीत पक्षाच्या इतर बड्या नेत्यांनी भेट घेतली होती. भाजपचा क्रिडा, सिनेमा, शिक्षण, संस्कृतीक कार्य अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न आहे. आमचा प्रत्येक क्षेत्रामधील तज्ज्ञांना सोबत घेण्याचा विचार असल्याचे पासवान यांनी सांगितले. पासवान यांनी धोनीबद्दल बोलताना, भाजपमध्ये धोनी आला तर ते आमच्यासाठी खूपच चांगले होईल. तो कोणत्याही नेत्यापेक्षा जनतेला अधिक प्रभावित करु शकतो, असे मत व्यक्त केले.

काँग्रेसनेही धोनीने भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेवर आपले मत व्यक्त केले आहे. धोनीला राजकारणात यायचे असेल तर कोणत्या पक्षात जायचे हा निर्णय तो स्वत: घेईल असे मत नोंदवले आहे. भाजप नेत्यांना देशातील लोकप्रिय व्यक्तींना पक्षाचे सदस्य करुन घेण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. भाजपमध्ये धोनी जाणार अशी चर्चा तर अमित शहांनी त्याची भेट घेतली होती तेव्हाही झाली होती, असे मत काँग्रेसचे नेते प्रेमचंद मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment