नरेंद्र मोदींच्या आवडत्या रेस्टॉरंटचे शटडाऊन


नवी दिल्ली – हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील मॉलरोडवरील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक असणारे ६५ वर्ष जुने बालजीस रेस्टॉरंट कायमचे बंद झाले. हे रेस्टॉरंट तेथे मिळणाऱ्या गुलाबजामसाठी खूप प्रसिद्ध होते. येथील गुलाबजाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही खूप आवडायचे. ज्यावेळी हिमालच प्रदेश भाजपचे मोदी प्रभारी होते ते त्यावेळी या रेस्टॉरंटमध्ये गुलाबजाम खाण्यासाठी आवर्जून यायचे. त्यांनी नुकताच नमो अॅपवरुन एका ब्लॉगमध्ये या रेस्टॉरंटचा आणि तेथे मिळणाऱ्या चविष्ठ गुलाबजामचा उल्लेख केला होता. येथे मिळणाऱ्या गुलाबजामचे मोदींबरोबरच इतरही अनेक दिग्गज चाहते होते.

१५ जुलै रोजी या रेस्टॉरंटच्या मालकाला सर्वोच्च न्यालायलाने जागा खाली करण्याचे आदेश दिले आहे. ही जागा खाली करुन लवकरात लवकर ती खऱ्या मालकाच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायलायाने या रेस्टॉरंटच्या मालकाला दिले आहेत. या रेस्टॉरंटसंबंधीत सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला सुरु होता. उच्च न्यायालयात हा खटला नंतर सुनावणीसाठी वर्ग करण्यात आला. रेस्टॉरंट मालकाकडून जागेचा मालक हा अधिक भाड्याची मागणी करत असल्याचा आरोप रेस्टॉरंट मालकाने केला होता. शिमल्यामधील या जागेचे भाडे बाजार भावानुसार दर महिन्याला दीड लाख रुपये एवढे आहे. पण जागेचे मालक रेस्टॉरंट मालकाकडून २५ लाख रुपयांची मागणी करत होता. हा वाद यावरुनच न्यायालयात गेला आणि हा वाद मिटवण्यासाठी न्यायालयाने रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्याचे आदेश दिले. रेस्टॉरंट मालकाला ही जागा खाली करण्यासाठी १० जुलै न्यायालयाकडून देण्यात आलेला शेवटचा दिवस होता. म्हणूनच या रेस्टॉरंटचे शटर ९ जुलै रोजी कायमसाठी बंद झाले.

हे रेस्टॉरंट १९५४ साली चंद्र बालाजी यांनी सुरु केले होते. त्यांचे १९९६ साली निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी रेणू बालाजी या रेस्टॉरंटचा कारभार पाहत होत्या. अखेर स्थापनेनंतर आता ६५ वर्षांनंतर हे रेस्टॉरंट बंद करण्यात आले आहे. शिमल्यातील प्रसिद्ध मॉल रोडवर फिरुन आल्यानंतर स्थानिकांबरोबर पर्यटकही येथील गुलाबजाम आणि पेस्ट्रीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून थांबायचे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हमीद करझाई, बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांच्याबरोबर नेते मंडळींमध्ये हिमाचल प्रदेशचे विरिष्ठ नेते वीरभद्र सिंह, शांता कुमार, प्रेम कुमार धुमळ आणि जयराम ठाकूर यांना येथील गुलाबजाम विशेष आवडायचे.

Leave a Comment