४० वर्षाच्या जलसमाधीनंतर भगवान अथी वरदार मूर्ती दर्शन सुरु


भारतात जेवढी विविधता तेवढ्या विविध परंपरा आणि रीतीरिवाज पाळले जातात. दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतापर्यंत येथे अनेक मंदिरे आहेत आणि त्या प्रत्येकाची वेगळी कहाणी आहे. तामिळनाडू मधील कांचीपुरम मध्ये सध्या भगवान वरदराजा स्वामी मंदिरात भगवान अथी वरदार मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी आली असून ही मूर्ती ४० वर्षातून एकदा जलसमाधीतून बाहेर काढली जाते आणि ४८ दिवस भाविकांना तिचे दर्शन घेता येते. ४९ व्या दिवशी पुन्हा या मूर्तीला मंदिराच्या पवित्र तलावात जलसमाधी देण्यात येते. जलसमाधीतून बाहेर आल्यावर येथे ४८ दिवस महोत्सव साजरा होतो. ४० वर्षातून एकदाच ही पर्वणी येते त्यामुळे या काळात मंदिरात दर्शनासाठी देश विदेशातून भाविक हजेरी लावतात.

यापूर्वी १ जुलै १९७९ साली ही मूर्ती जलसमाधीतून बाहेर काढली गेली होती. यंदा ती १ जुलैला जलसमाधीतून बाहेर काढली गेली असून तिचे अंतिम दर्शन १९ ऑगस्टपर्यंत भाविक घेऊ शकणार आहेत. त्यानंतर मात्र या मूर्तीच्या दर्शनासाठी ४० वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. हही प्रथा का पडली याचा नक्की इतिहास उपलब्ध नाही. शयन अवस्थेतील या मूर्तीचा हात अभय मुद्रेत आहे. याचा अर्थ भगवान आशीर्वाद देत आहेत असा आहे. शेकडो वर्षापूर्वी कधीतरी या मंदिरातील पुजारयाला स्वप्नात दर्शन देऊन भगवानने ही मूर्ती मंदिराच्या तलावात ठेवावी असा दृष्टांत दिला होता असे सांगितले जाते.


तलावातून बाहेर काढल्यावर ही मूर्ती प्रथम काळी दिसते मात्र नंतर ती लाल करड्या रंगाची दिसते. सर्वात नवल म्हणजे ही मूर्ती ९ फुटी असून अंजिराच्या झाडाच्या लाकडापासून बनविली गेली आहे. हे लाकूड पाण्यात अधिक मजबूत बनते असे सांगितले जाते. मूर्ती जलसमाधीतून बाहेर काढल्यावर स्वच्छ केली जाते मात्र तिची पूजा अथवा अभिषेक केला जात नाही. भाविकांनी वाहिलेली फुले आणि नैवेद्य स्वीकारला जातो. मूर्ती परत तलावात ठेवताना तिच्यावर औषधी लेप केला जातो. पहिले २४ दिवस मूर्ती कलत्या पोझमध्ये ठेवली जाते व नंतरचे २४ दिवस उभ्या पोझ मध्ये असते. सध्या सुरु असलेल्या महोत्सवानंतर ही मूर्ती २०५९ साली जलसमाधीतून पुन्हा बाहेर काढली जाईल.

Leave a Comment