ऋषभ पंत आऊट होताच शास्त्री बुवांवर भडकला विराट कोहली


मुंबई : विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा प्रवास संपला आहे. भारताचा 18 धावांनी पराभव करत न्यूझीलंडने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचं आव्हान पार करताना भारताचे आघाडीचे तीनही फलंदाज अवघ्या 5 धावात बाद झाले. युवा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत त्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात आला.

काही वेळासाठी ऋषभ पंतने विकेट थोपवून थरली. पण अपेक्षा तो पूर्ण करु शकला नाही. पंत एक चुकीचा फटका मारुन माघारी परतला. 55 चेंडूत पंतने 32 धावा केल्यामुळे पंतच्या फलंदाजीवर आता टीका होत आहेत. महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक यासारखे अनुभवी खेळाडू भारताकडे होते, त्यामुळे 3 विकेट तातडीने गेल्यानंतर, या दोघांपैकी एकाला पंतच्या आधी फलंदाजीला पाठवणे अपेक्षित होते.

मिशेल सँटेनरच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा पंतने प्रयत्न केला. मात्र कॉलिन डी ग्रँडहोमने त्याचा झेल टिपला आणि तो बाद झाला. पंत बाद झाला त्यावेळी भारताची अवस्था 5 बाद 71 अशी झाली.


ड्रेसिंग रुममध्येही पंत बाद झाल्यानंतर वातावरण तापले. रागारागात बाहेर येऊन बाल्कनीत बसलेले प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी कर्णधार विराट कोहली बोलू लागला. अत्यंत रागात कोहली रवी शास्त्रींशी बोलत होता. एकप्रकारे तो रवी शास्त्रींना जाब विचारत असल्याचे दिसत होते.

3 बाद 5 अशी अवस्था असताना, भारताच्या मधल्या फळीने विकेट थोपवून धरणे आवश्यक होते. महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी जे काम केले, तेच काम पंत, कार्तिक आणि हार्दिक पंड्याकडून अपेक्षित होते. पण हे तिघेही अपयशी ठरल्यामुळे विश्वचषकात अव्वलस्थानी असलेला भारतीय संघ महत्त्वाच्या सामन्यात पराभूत झाला आणि विश्वचषकातील आव्हानच संपुष्टात आले.

Leave a Comment