आनंद कुमार यांना ब्रेन ट्युमर


गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला सुपर ३० चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. याच दरम्यान एक धक्कादायक खुलासा आनंद कुमार यांनी केला आहे.

नुकतेच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत आनंद कुमार यांनी आपल्याला ब्रेन ट्यूमर असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर मरणाआधी स्वतःचा बायोपिक पाहाण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिवंत असेपर्यंत स्वतःचे काम आणि प्रवास पाहायचा होता. कधीपर्यंत मी जगेल याबद्दल काहीही माहिती नसल्याने चित्रपटाच्या लेखकानेही जितके शक्य होईल तितक्या लवकर चित्रपटाची कथा लिहिली, असे आनंद कुमार यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले, की माझी अवस्था २०१४ मध्ये अशी झाली होती, की माझ्या उजव्या कानाने मी ऐकू शकत नव्हतो. मी यासाठी पटनामध्ये अनेक उपचार घेतले आणि काही तपासणींनंतर हे समोर आले, की माझ्या उजव्या कानाची श्रवणक्षमता ८० ते ९० टक्क्यांनी कमी झाली आहे. नंतर दिल्लीच्या एका रूग्णालयात अनेक तपासण्या केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी सांगितले, की कानाची नस मेंदूपर्यंत जिथे जाते तिथे ट्युमर आहे, यासाठी मी सध्या मुंबईच्या हिदूंजा रूग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी ऋतिकचेही आनंद कुमार यांनी कौतुक केले. ऋतिकशिवाय या चित्रपटाला दुसरे कोणीही न्याय देऊ शकले नसते. तो एक उत्तम अभिनेता आहे आणि सध्या त्याच्यासोबत माझे रोज बोलणे होते. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत माझा जीवनप्रवास बरोबर मांडला जावा यासाठी १३ वेळा मी चित्रपटाची स्क्रिप्ट वाचली आणि ती अगदी बरोबर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment