‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’च्या सेटवरील फोटो सोनाक्षीने केला शेअर


लवकरच ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोनक्षी सिन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातच तिने आता आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच १९७१ च्या भारत पाक युध्दाची कथा असलेल्या ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटाची घोषणा झाली होती. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सोनाक्षीने आता चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे.

सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण हैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये सुरू आहे. या चित्रपटात सोनाक्षी सामाजिक कार्यकर्ती सुंदरबेन जेठा यांची भूमिका साकारत आहे. सोनाक्षीने चित्रपटाच्या सेटवरील मातीच्या घराचा फोटो शेअर करत ‘भूज: द प्राईड ऑफ इंडिया’ असे कॅप्शन दिले आहे.

या चित्रपटात अजय देवगण स्क्वाड्रन लिडर विजय कर्णिक यांची भूमिका साकारणार आहे. अजय आणि सोनाक्षीशिवाय या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाष, संजय दत्त, राणा दग्गुबती आणि परिणीती चोप्रा यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक दुधाईया करत असून हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२० रोजी रिलीज होणार आहे.

Leave a Comment