गाडी चालवताना टिकटॉक व्हिडीओ काढल्याने ट्रक ड्रायव्हर निलंबित


टिकटॉक सध्या अनेकांच्या आवडीचे अ‍ॅप बनले आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच या अ‍ॅप ने वेड लावले आहे. आपल्या आवडीच्या गाण्यांवर डान्स करणे अथवा एखाद्या प्रसिध्द डायलॉगवर काहीतरी करणे, यासाठी हा अ‍ॅप भलताच चर्चेत आहे. टिकटॉकवरील अनेक नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात.

शाळेत, घरात, कामावर अनेक ठिकाणी लोक या अ‍ॅपवर व्हिडीओ बनवत असतात. मात्र चालत्या गाडीमध्ये टिकटॉक व्हिडीओ बनवणे धोकादायक ठरू शकते. असे कृत्य केल्याने जिवाला धोका देखील निर्माण होऊ शकतो.

चालत्या गाडीमध्ये ड्रायव्हरने टिकटॉक व्हिडीओ बनवल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. अमनज्योत बरार असे या ड्रायव्हरचे नाव असून, 7 जुलै रोजी जालंधर ते दिल्लीला जाताना गाडी चालवत असतानाचा मोबाईलमध्ये टिकटॉक व्हिडीओ काढत होता.

सोशल मीडियावर अमनज्योत यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. मात्र गाडी चालवत असताना व्हिडीओ काढणे अमनज्योत यांना चांगलेच महागात पडले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंजाब रोडवेजने अमनज्योत यांना निलंबित केले आहे. तसेच त्यांची चौकशी सुरू आहे.

या घटनेनंतर रोडवेजचे जनरल मॅनेजर प्रणितसिंह मिन्हास म्हणाले की, अशा निष्काळजीपणाकडे अजिबात दुर्लेक्ष केले जाणार नाही. व्हिडीओ पाहिल्यानंतर मी लगेचच त्याला निलंबित केले.

तसेच या घटनेनंतर प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक ड्रायव्हरची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे, मिन्हास यांनी सांगितले. तसेच अन्य ड्रायव्हरला देखील गाडी चालवताना टिकटॉक अथवा दुसरा कोणताही अ‍ॅप न वापरण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.