रद्द होणार 20 कोटींहून अधिक पॅनकार्ड !


केंद्रातील मोदी सरकारने 31 ऑगस्ट 2019 पर्यंत व्यक्ती, हिंदू अविभाजित परिवार, कंपनी, ट्रस्ट किंवा इतर कोणत्याही श्रेणीमध्ये जारी केलेले पॅन कार्ड जर का आधार कार्डशी जोडले गेले नाही तर त्याला अपात्र घोषित केले जाईल, असा निर्णय घेतला असल्यामुळे देशात 20 कोटीहून अधिक पॅन कार्ड रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. आयकर विभागाने एकदा का अपात्र म्हणून घोषित केले की, अशा पॅन कार्डचा वापर केला जाऊ शकत नाही.

याबाबत माहिती देताना केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशात सध्या 43 कोटी पॅन कार्ड धारक आहेत, तर देशातील 120 कोटी लोकांकडे आधार कार्ड असल्यामुळे पॅन कार्डला आधार कार्डशी जोडणे अवघड ठरणार नाही. आधार कार्ड ज्या लोकांकडे नसेल त्यांना नवीन आधार कार्ड घेण्यासाठी 40 पेक्षा जास्त दिवसांचा अवधी मिळत आहे. इतक्या दिवसात सहज आधार कार्ड मिळू शकेल.

फक्त कर्ज घेण्यासाठी पॅन कार्ड तयार करून त्याचा वापर केला जात आहे. आता अशा प्रकारच्या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी पॅनला आधारशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही तरतूद आयकर कायदा कलम139 एएमध्ये एक उपधारा जोडून करण्यात आली आहे. पॅन आणि आधार एकमेकांशी जोडले नाही तर, हे पॅन कार्ड 1 सप्टेंबर 2019 पासून अपात्र ठरेल. त्याला त्यानंतर आयकर विभागाच्या डेटा बेसमधून हटवले जाईल.

Leave a Comment