कंगनाच्या वतीने एकता कपूरने मागितली पत्रकारांची माफी


अभिनेत्री कंगना राणावत हिने ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारावर केलेल्या आरोपातून झालेल्या वादविवादाचा प्रकार हा दुर्दैवी होता, या प्रकाराबद्दल आपल्याला खंत वाटते, असे सांगत निर्माती एकता कपूर हिने कंगनाच्या वतीने एका निवेदनाद्वारे माफी मागितली आहे. ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने या वादविवाद प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत आणि निर्माती एकता कपूर यांच्यावर बहिष्कार टाकत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. माफीचे निवेदन एकता कपूरने दिल्यानंतर ते स्वीकारल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे, पण अजूनही कंगनाने माफी मागितली नसल्याने तिच्यावरचा बहिष्कार कायम ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.

‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटातील गाण्याचे प्रकाशन करण्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एका पत्रकाराने या वेळी प्रश्न विचारला असता, कंगनाने त्याला उत्तर देण्याऐवजी त्याने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाची जाणूनबुजून बदनामी केल्याचा आरोप केला. या दोघांमध्ये या वेळी सुरू झालेला वाद एवढा वाढला की, एकता कपूर आणि राजकुमार राव यांनी अखेर उपस्थितांची माफी मागत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण पत्रकारावर कंगनाने नाहक आरोप करत उगाचच वाद निर्माण केल्यामुळे तिने आणि निर्माती एकता कपूरने याप्रकरणी माफी मागावी. तोवर त्यांच्यावर सगळ्या माध्यमांवरून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने जाहीर केले.

Leave a Comment