बस चालक परवाना मिळविणारी पहिली इंजिनिअर मुलगी


मुंबईची बेस्ट बस सेवा म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाते. २४ वर्षीय प्रतीक्षा दास ही मुलगी या बेस्ट बसच्या संदर्भात सध्या चर्चेत आली आहे. कारण बेस्ट बस चालक परवाना मिळविणारी ती पहिली महिला आहे. सर्वसाधारणपणे बस किंवा ट्रकचालक फार शिकलेले नसतात असा समज आहे. हा समज प्रतीक्षाने खोटा पाडला आहे कारण जून २०१९ मध्ये ती मेकॅनिकल इंजिनिअर परीक्षा पास झाली आहे आणि ती बेस्ट बस चालविते आहे.

प्रतीक्षाला लहानपणापासून गाड्यांचा शौक आहे. ती बाईकर आहे, विविध कार्स चालविते पण तिची पहिली पसंती बस आणि ट्रक चालविण्यास आहे. ती तरुण आहे, मुलगी आहे त्यामुळे या वयातील शॉपिंग, भटकंती, सोशल मिडिया हे सर्वमान्य छंद तिलाही आहेत. इन्स्टाग्रामवर ती चांगलीच अॅक्टीव्ह असून तिच्या रेसरचिक अंडरस्कोर ११ अकौंटचे सुमारे ५० हजार फॉलोअर्स आहेत. ती सांगते, बस आणि ट्रक चालविणे हे माझे स्वप्न होते आणि ते आता पुरे होत आहे. तिला आरटीओ अधिकारी व्हायचे आहे आणि त्यासाठी हेवी व्हेईकल चालक परवाना असणे बंधनकारक आहे.


प्रतीक्षा सांगते, बस किंवा ट्रकसारखे वाहन चालवायला ताकद लागते. गाडीचे वजन जास्त असते, चाके मोठी असतात त्यामुळे स्टेअरिंग वळविताना, गाडीवर नियंत्रण ठेवताना ताकद वापरावी लागते. ती जेव्हा प्रथम बस चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेली तेव्हा तेथील प्रशिक्षकांना आश्चर्य वाटले. कारण ती एकतर मुलगी होती आणि तिच्यात किती ताकद असेल याची त्यांना शंका होती. कदाचित मुलीला बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची त्यांचीही पहिलीच वेळ असावी. पण हे प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करून प्रतीक्षाने तिच्या जिद्दीचे दर्शन घडविले आहे.