जुने २०० रुपयांचे देणे फेडण्यासाठी आला केनियाचा खासदार


उसने पैसे घेऊन ते बुडविणाऱ्यांची संख्या जगात कमी नाही. पण ३० वर्षापूर्वी घेतलेले २०० रुपये परत करण्यासाठी केनियाचे खासदार रिचर्ड टोंगी भारतात परत येतात हे ऐकले की माणुसकीवरचा विश्वास दृढ होतो. औरंगाबाद मध्ये राहणाऱ्या काशिनाथ गवळी यांना हा सुखद अनुभव नुकताच आला जेव्हा त्यांनी दार वाजले म्हणून दरवाजा उघडला तेव्हा. दारात एक अनोळखी परदेशी माणूस उभा तोही पत्नीसह हे पाहून गवळी थोडे गोंधळले पण त्या माणसाने म्हणजे रिचर्ड टोंगी यांनी त्यांना पूर्वीची ओळख दिली आणि जुने कर्ज परत करण्यासाठी आल्याचे सांगितले. गवळी यांच्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या आणि त्यांना एकदम गहिवरून आले.


रिचर्ड या संदर्भात खुलासा करताना म्हणाले, १९८५ ते ८९ या काळात ते व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेण्यासाठी औरंगाबाद येथे राहत होते तेव्हा त्यांची परिस्थिती बिकट होती. त्यावेळी गवळी रेशन दुकान चालवीत असत. याच भागात रिचर्ड राहत होते. त्याकाळी गवळी यांनी त्यांना फार मदत केली होती. त्याची जाणीव रिचर्ड यांनी कधीच बुजु दिली नाही. कधीतरी आपण परत येऊ आणि गवळी यांचे कर्ज फेडू अशी मनीषा त्यांनी बाळगली होती आणि ती पूर्ण केली. रिचर्ड सांगतात, गवळी यांना भेटून मला त्यांना धन्यवाद द्यायचे होते कारण अडचणीत त्यांनी माझी मदत केली होती. देव या परिवाराचे भले करो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

या अनोख्या पाहुण्यामुळे आनंदलेल्या गवळी परिवाराने रिचर्ड यांना हॉटेल मध्ये जेवायला चला असा आग्रह केला पण रिचर्ड यांनी घरीच जेऊ असे सांगून या कुटुंबासह भोजनाचा आस्वाद घेतला. जाताना त्यांनी गवळी यांना माझ्या देशात या असा आग्रह सुद्धा केला.

Leave a Comment