कैद्यांच्या हाताचे चविष्ट भोजन मिळणार ऑनलाईन


केरळच्या थ्रिसुर वैयुर मध्यवर्ती जेलमधील कैद्यांनी बनविलेले चविष्ट भोजन आता वेगवेगळ्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांना पुरविणारा असून स्वीगी या जेलच्या ६ किमी परिसरात हे पदार्थ पोहोचविणार आहे. या जेलमधील कैद्यांना स्वरोजगार म्हणून कुकिंग, फूड पॅकेजिंगचे प्रशिक्षण दिले गेले असून सध्या जेल बाहेर कौंटरवर दररोज चिकन बिर्याणी, रोटी, चिकन करी, भाज्या विकल्या जात आहेत आणि त्याला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.


हा प्रतिसाद लक्षात घेऊन हे पदार्थ ऑनलाईन विक्री करता येतील अशी कल्पना आयपीएस ऋषीराजसिंग यांनी सुचविली. ते सध्या येथे डीजीपी आहेत. त्यानुसार फ्रीडम कॉम्बो लंच सुरु केले गेले असल्याचे जेल सुप्रीटेन्डेंट निर्मलनंदन यांनी सांगितले. ते म्हणाले या पॅक मध्ये बिर्याणी, रोस्टेड चिकन लेग पीस, ३ रोट्या, चिकन करी, सॅलड, डेझर्ट आणि बिसलेरी पाणी बाटली, सोबत केळीच्या पानासह दिली जाते आणि त्यासाठी फक्त १२७ रुपये आकारले जातात. ११ जुलै पासून ही डिलिव्हरी सिस्टीम सुरु झाली आहे.


येथील बाहेरच्या औटलेट वर दररोज २५ ते ३० हजार रोट्या, ५०० ते ६०० चिकन बिर्याणी, ३०० प्लेट भाज्या यांची एका दिवसात विक्री होते आहे. १०० पुरुष कैदी हे पदार्थ दररोज बनवितात त्यासाठी त्यांना दररोज १५० रुपये रोजगार दिला जातो. यासाठी जेल मध्ये ५० लाख रुपये खर्चून अद्ययावत किचन बनविले गेले आहे.

Leave a Comment